गॅस कटरने एटीएम मशिन फोडून लांबवली २३ लाखांची रोकड

    पिंपरी : भोसरी पांजरपोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. चोरट्याने एटीएम मशीनमधील २२ लाख ९५ हजार ६०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. अरविंद विद्याधर भिडे (वय ५८, रा. सहकारनगर, पुणे) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांजरपोळ येथे पुणे-नाशिक महामार्गावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. बुधवारी (दि. ९) रात्री साडेदहा ते गुरुवारी (दि. १०) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. मशीनमधून पैशांच्या चार कॅसेट चोरल्या. यामध्ये २२ लाख ९५ हजार ६०० रुपये रोख रक्कम होती. तसेच चोरट्याने ३० हजार रुपयांचे नुकसान केले. एटीएम फोडल्याची ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. फौजदार रवींद्र भवारी तपास करीत आहेत.