गॅसची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

वाघोली : वाघोली (ता : हवेली) परिसरात भारत गॅसच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी करणारी टोळी लोणीकंद पोलिसांनी पकडली असून पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून सहा जणांसह एजन्सी चालक व जागा मालक यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त : लोणीकंद पोलिस व महसूल विभागाची कारवाई

वाघोली : वाघोली (ता : हवेली) परिसरात भारत गॅसच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी करणारी टोळी लोणीकंद पोलिसांनी पकडली असून पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून सहा जणांसह एजन्सी चालक व जागा मालक यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल जगाराम बिष्णोई (वय २२), राजेश सैराम बिष्णोई (वय २७), कैलास बाबूराम बिष्णोई (वय २४), गोपाल बाबूराम बिष्णोई (वय २३), श्रावण खमूराम बिष्णोई (वय २९), कैलास बिरबलराम बिष्णोई (वय २०) यांच्यासह एजन्सी चालक व जागा मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना लोणीकंद गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत रोहन अभिलाषा सोसायटीजवळ (भावडी रोड, वाघोली, ता. हवेली) काही इसम एका गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या गॅस िसलिंडरमध्ये गॅस भरत (रिफिलींग)असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत याबाबत हवेली तहसिलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना माहिती दिली. हवेलीचे पुरवठा निरीक्षक, वाघोलीचे मंडल अधिकारी, तलाठी व लोणीकंद पोलिसांनी छापा घातला. यामध्ये एम. एस. चौधरी यांच्या मालकीचे जागेत (गट क्र.१५०६) सहा इसम प्रत्येकी भरलेल्या गॅस िसलिंडरमधून एक ते दोन किलो गॅस काढून दुसऱ्या िसलिंडरमध्ये भरताना लोणीकंद पोलिसांनी मोठ्या शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्व वाघोलीतील प्रियांकानगरी येथील सुमित शिंदे यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहत आहेत. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सुमित शिंदे यांच्या भारत गॅस एजन्सी प्रियांकानगरी, पुणे येथील एजन्सीच्या गोडावूनमधून टाटा कंपनीच्या ४०७ टेम्पो (एमएच १२ जीटी ९४५६), अॅप्पे पॅगो (एमएच १२ केपी ८२४६), अॅप्पे पॅगो (एमएच १२ एलटी ००४९), अॅप्पे पॅगो (एमएच १२ एलटी २५३२), अॅप्पे पॅगो (एमएच १२ केपी ७६९०) या वाहनांमधून भरलेले िसलिंडर घेऊन आल्याची कबुली दिली.

 एजन्सी चालक, जागा मालकाविरूध्द गुन्हा
आराेपींच्या ताब्यातील १९४ गॅसने भरलेले िसलिंडर, २७ रिकामे िसलिंडर, ३ डिजीटल गॅस वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारे ४ लोखंडी पाईप यासह ४ अॅप्पे पॅगो व एक टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो असा एकूण १३ लाख ५८ हजार ७६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवेली पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत सहा जणांसह एजन्सी चालक, जागा मालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, हवेली तहसीलदार सुनील कोळी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार संजय भोसले, हवेली पुरवठा निरीक्षक चनबस गवंडी, सहाय्यक निरीक्षक संजय टाक, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, तलाठी गणेश सासणे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, गुन्हे शोध पथकाच्या टीमने कारवाई केली.