‘लग्नात हुंडा कमी दिला, आता २० लाखांचा फ्लॅट घेऊन द्या’; विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ

    पिंपरी : लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याने देहूरोड येथे २० लाख रुपयांचा फ्लॅट घेऊन द्या, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत घडली. शैलेश अरविंद उत्तरकर (वय ३२), शर्मिला अरविंद उत्तरकर (वय ५५, दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

    पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित विवाहिता सासरी नांदत असताना त्यांच्या आई-वडिलांनी लग्नात कमी हुंडा दिल्याने देहूरोड येथे २० लाख रुपयांचा फ्लॅट घेऊन द्या, अशी मागणी आरोपींनी विवाहितेच्या वडिलांकडे केली. ती मागणी पूर्ण होत नसल्याने आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करून मारण्याची तसेच पतीने दुसरे लग्न करण्याची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक छळ केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.