सत्ताधारी भाजपची ‘मलिदा’ लाटणारी ‘पे अँड पार्क’ योजना हद्दपार करा

पे अँड पार्क' योजनेला विरोध मुळीच नाही. मात्र, अशा जाचक योजनेसाठी नागरिकांच्या सुचना - हरकती यांचा विचार झालेला नाही. योजनेचा कोणताही आराखडा जनतेपुढे ठेवलेला नाही. केवळ मलिदा लाटण्यासाठी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भाजपने ही योजना मंजूर केली.

    पिंपरी: सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर सर्व स्तरातून विरोध असतानाही पिंपरी – चिंचवड शहरात ‘पे अँड पार्क’ योजना लागू केली आहे. मुळात या योजनेत अनेक त्रुटी आहेत. शहरातील मुख्य रस्त्याकडेला असणाऱ्या बँकांसमोर महापालिकेने ‘पे अँड पार्क’ लागू केले आहे. बँकेत पाच मिनिटांच्या कामासाठी आलेल्या ग्राहकाला पाच ते वीस रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागत आहेत. त्यामुळे ही दडपशाही बंद करा आणि ‘पे अँड पार्क’ योजनेतून बँकांना वगळून सावकारी थांबवा. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

    पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड महापालिकेने शहरात १ जुलैपासून ‘पे अँड पार्क’ ही योजना कार्यान्वित केली. या पार्कींंग धोरणाची अंमलबजावणी शहरात सुरु आहे. यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे. त्यात एकूण ४५० ‘पे अँड पार्क’ ची ठिकाणे आहेत. त्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार शहरात दिवसा आणि रात्रीही या रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

    पुरेशा जागेअभावी बँकातील पार्कींंग सुविधा आधीच तोकडी आहे. त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकाला रस्त्यावर वाहने पार्क करावी लागतात. ‘पे अँड पार्क’ मुळे रस्त्यावर लावलेल्या वाहनांकडून पावतीच्या माध्यमातून दंड आकारला जात आहे. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. त्यांना आर्थिक भुर्दंडालाही सामोरे जावे लागत आहे. पिंपरीतील स्टेट बँक, संभाजीनगरमधील एचडीएफसी बँक, आकुर्डीची सेन्ट्रल बँक व शहरातील इतरही खासगी व सरकारी बँकांमध्ये पार्कींगला जागाच नाही. वाहने रस्त्यावर लावल्यामुळे पावती फाडणारे व्यवस्थापन व नागरिकांमध्ये बाचाबाची होत आहे. त्यासाठी हा प्रकार त्वरीत थांबवा आणि बँकासमोरील ‘पे अँड पार्क’ हटवा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही संपूर्ण शहरातूनच ‘पे अँड पार्क’ योजना बंद करू, असा इशारा गुप्ता यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

    ”पे अँड पार्क’ योजनेला विरोध मुळीच नाही. मात्र, अशा जाचक योजनेसाठी नागरिकांच्या सुचना – हरकती यांचा विचार झालेला नाही. योजनेचा कोणताही आराखडा जनतेपुढे ठेवलेला नाही. केवळ मलिदा लाटण्यासाठी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भाजपने ही योजना मंजूर केली. त्याला शिवसेनेचा विरोध आहे. सरकारच्या जागेवर ‘पे अँड पार्क’ करा. बँकांच्या आवारात ‘पे अँड पार्क’ची गरज नाही. व्यवसायिक असो की साधा खातेदार यांची दररोज बँकेत वर्दळ असते. मग उठसुठ पाच-दहा मिनिटाला वाहने पार्क करण्यासाठी पावती फाडायची, हे सहन केले जाणार नाही.”

    – विजय गुप्ता (शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक)