घोडेगांव ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे

मंचर : आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन दिल्याने बेघरवस्ती येथील रहिवाश्यांनी उपोषण मागे घेतले. बेघरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत योग्य तो सकारात्मक मार्ग ग्रामपंचायत दोन महिन्याच्या आत काढेल,असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले.

बेघरवस्ती येथे जाणाऱ्या रस्त्यासाठी तेथील रहिवाशी स्वप्नील कोरडे, राहुल जाधव, सोमनाथ कोरडे हे पंचायत समिती  घोडेगांव कार्यालयासमोर शुक्रवार (दि.७) पासुन उपोषणास बसले होते. उपोषणाची दखल घेवुन रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढुन घेण्याबाबत कार्यवाही करुन बेघर वस्तीसाठी रस्ता देण्याची कार्यवाही करावी.असे आदेश गटविकास अधिकारी जाqलदर पठारे यांनी ग्रामपंचायतीला दिले. त्यानुसार सरपंच क्रांतीताई गाढवे, ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समावेत सकारात्मक चर्चा झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा त्याबाबत उपाययोजना करण्याच्या कामात गुंतलेली आहे. रस्त्याबाबत योग्य तो सकारात्मक मार्ग ग्रामपंचायतीच्या वतीने दोन महिन्याच्या आत काढण्यात येईल. असे लेखी आश्वासन ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी दिल्याने उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.