जुन्नरवासियांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करा; काजळे यांची मागणी

    जुन्नर : जुन्नर शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी किंवा त्यामध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी नागरिक हक्क व संघर्ष समितीच्या वतीने नगरसेवक मधुकर काजळे यांनी जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारींकडे केली आहे. कोरोनामुळे जुन्नरमधील नागरिक त्रस्त असून, कोरोना काळातील बंदमुळे व्यापारी वर्ग देखील आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला असून, सर्वच नागरिकांना नगरपालिकेकडून सहकार्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने पाणीपट्टी व घरपट्टीमध्ये सवलत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

    जुन्नरमधील नगरपालिकेच्या मालकीची विविध व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे लॉकडाऊन कालावधीतील भाडे, दंडव्याज नगरपालिकेने माफ करण्यासंदर्भात तसा ठराव करून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तातडीने प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

    तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना सरकारी योजनेतून अर्थसहाय्य मिळवून देण्यात यावे. त्याचप्रमाणे जुन्नर नगरपालिका फंड अथवा लॉकडाऊन काळातील दंडवसूलीमधून जमा झालेल्या रकमेतून गरीब, अंध, अपंग, विधवा यांसारख्या घटकांना सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी नागरिक हक्क संरक्षण व संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.