पिंपरी चिंचवड शहराला फेसबुक आणि ट्विटरवर स्वतंत्र ओळख द्या : आमदार महेश लांडगे

. गुगल मॅप्स वरील ठिकाणाचा पत्ता वाचला तर सर्वात शेवटी ते पुणे ऐवजी शहराचे नाव 'पिंपरी चिंचवड' असे देतात. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. गुगल प्रमाणे शहराची वेगळी ओळख प्रस्थापित करून फेसबुक, ट्विटरने येथील नागरिकांच्या भावनेचा सन्मान करावा

    पिंपरी: फेसबूक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र ओळख द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत फेसबूक आणि ट्विटरच्या भारतातील कार्यालयाकडे मागणी पत्र दिले आहे. त्यावर कार्यवाही झाल्यास जगातील या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र शहर म्हणून ओळख दिली जाईल.

    फेसबुक, ट्विटर ही सोशल मीडिया माध्यमे संपूर्ण जगभरात कमालीची लोकप्रिय आहेत. त्याचा वापर नागरिक दैनंदिन जीवनात करत असतात. परंतु, आमच्या असे लक्षात आले की, शेजारील पुणे शहराप्रमाणे फेसबुक आणि ट्विटरवर आमच्या ‘पिंपरी चिंचवड’ शहराला स्वतंत्र मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे येथील अनेक नागरिक लोकेशन निवडताना पुणे निवडतात किंवा पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी अशी भागांची/गावांची नावे निवडतात. शहराचा अभिमान असणाऱ्या नागरिकांना ही बाब खटकते.

    २०१७ साली तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर जेव्हा या शहराचे आयुक्त म्हणून रुजू झाले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल फेसबुक व ट्विटरवर पोस्ट टाकताना शहराचे नाव टॅग करता आले नाही याबद्दल त्यांनी एका कार्यक्रमात खंत व्यक्त केली होती. दुसरीकडे गुगल मॅप्सने पिंपरी-चिंचवड शहराला वेगळी मान्यता दिली आहे. गुगल मॅप्स वरील ठिकाणाचा पत्ता वाचला तर सर्वात शेवटी ते पुणे ऐवजी शहराचे नाव ‘पिंपरी चिंचवड’ असे देतात. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. गुगल प्रमाणे शहराची वेगळी ओळख प्रस्थापित करून फेसबुक, ट्विटरने येथील नागरिकांच्या भावनेचा सन्मान करावा अशी मी शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने मागणी केली आहे. तसा पत्रव्यवहार आम्ही केला आहे. फेसबुक, ट्विटर कंपनीच्या भारतातील कार्यालय प्रतिनिधींनी सदर मागणीची दखल घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे.

    पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी शहराचा अभिमान जपत घरच्या, कार्यालयाच्या पत्त्यामध्ये ‘पिंपरी चिंचवड’ हे नाव आवर्जून लिहावे. ऑनलाईन पोर्टलमध्ये शहराचे नाव निवडताना, जर तिथे ‘पिंपरी चिंचवड’ नाव नसेल तर संबंधित व्यवस्थापनाला विनंती करून शहराचे नाव यादीत जोडण्यास सांगावे, असे आवाहनही आमदार महेश लांडगे यांनी केले आहे