पिंपरी चिंचवडकरांसाठी खुशखबर ! दिवाळीपर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन

वाघोली पाणीपुरवठा योजनेतून २०, तर एमआयडीसीकडून १० एमएलडी पाणी मिळणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात एकदिवसाड पाणीपुरवठा असूनही कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून २० एमएलडी आणि एमआयडीसीकडील १० एमएलडी असे एकूण ३० एमएलडी पाणी तत्काळ घेण्यात येणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने सुरळीत आणि समान पाणीपुरवठा होईल, असा विश्वास सभागृह नेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केला. तसेच दिवाळीपर्यंत भामा-आसखेड धरणातून १०० एमएलडी पाणी शहरासाठी उपलब्ध होईल. त्यानंतर दररोज पाणीपुरवठा करता येईल, असेही ते म्हणाले.

पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाड पाणीपुरवठा केला जात आहे. तो अद्यापही सुरु आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा असूनही शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. समन्यायी पाण्याचे वाटप होत नाही. पाणीपुरवठा विस्कळीत आहे. गृहनिर्माण सोसाट्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिका पदाधिकारी आणि अधिका-यांची नुकतीच बैठक झाली.

महापौर उषा ढोरे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहरअभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.बैठकीची माहिती देताना सभागृह नेते नामदेव ढाकेम्हणाले, एक दिवसाआड पाणी पुरवठा असतानाही पाणी पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पवना नदीवरील रावेत बंधा-यातून अशुद्ध पाणी उपसून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. या योजनेतून शहरासाठी तत्काळ २० एमएलडी पाणी घेण्यात येणार आहे.तर, एमआयडीसीला दिलेला १० एमएलडीचा कोटा परत घेतला जाणार आहे. त्यामुळे ३० एमएलडी पाण्याची उपलब्धता वाढणार असून अविस्कळीत पाणीपुरवठा सुरळित होईल.

पाणीपुरवठ्याचे २५ ते ३० वर्षांचे पाईप बदलण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याची गळती कमी झाली आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. भामा-आसखेड, आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेच्या कामाचा आढावा घेतला. सिंटेल कंपनीकडून एक एकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. तिथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.भामा-आसखेड धरणातून १०० एमएलडी पाण्याचा कोटा शहरासाठी आरक्षित आहे. दिवाळीपर्यंत ते पाणी आणण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर दिवाळीनंतर दररोज पाणीपुरवठा करता येवू शकेल असे ढाके यांनी सांगितले.

भामा-आसखेड योजनेच्या कामाला गती देण्यात येणार आहे. त्याचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. अधिका-यांवर कामाच्या जबाबदा-या निश्चित केल्या आहेत. ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्यात येईल. जलदगतीने काम पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सह शहरअभियंता रामदास तांबे म्हणाले, ”पाणी उचलणे कमी केले नाही. फक्त एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना धरणातून ५०० आणि एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी उचलले जाते. आता वाघोली पाणीपुरवठा योजनेतून २० आणि एमआयडीसीला दिलेला १० एमएलडीचा कोटा परत घेतला जाणार आहे. वाढीव ३० एमएलडी पाण्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.तसेच दिवाळीपर्यंत भामा-आसखेड धरणातून १०० एमएलडी पाणी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत”.