सांगलीत बेदाण्याला आला ‘भाव’; प्रतिकिलो २१० रुपये दर

    सांगली : येथील मार्केट यार्डात झालेल्या सौद्यात हिरवा बेदाना २१० तर पिवळा बेदाण्याला २०० रुपये असा किलोस उच्चांकी भाव मिळाला. परिणामी, उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी बेदाणे विक्रीसाठी यार्डात घेऊन यावे, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले.

    यार्डात बुधवारी शंभर गाडी बेदाण्याची आवक झाली. सभापती पाटील, सचिव महेश चव्हाण व कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेल्या नियमांचे पालन करून सकाळी १० ते ४ या वेळेत सौदे काढण्यात आले.

    लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर बुधवारी बेदाण्याचे दुसऱ्यात सौदे काढण्यात आले होते. मालाची प्रचंड आवक झाली होती. खरेदीसाठी व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी १० वाजता सौद्याला सुरुवात झाली. योग्य नियोजन केल्याने ३५ दुकानांमध्ये शंभर गाडी (एक हजार टन) बेदाणा आवक झाली होती. सौद्यात हिरवा चांगला बेदाण्यास १५० ते २१० रुपये, मध्यम बेदाण्यास १२० ते १७० रुपये, काळा बेदाणा ४० ते ६० रुपये असा किलोस भाव मिळाला.

    दम्यान, मार्केटमध्ये बुधवारी आणि शुक्रवार बेदाणा सौद्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी बेदाणे विक्रीसाठी आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र कुंभार, मनोज मालू, शेखर टक्कर, सतीश पटेल, पवन चौगुले, हिरन पटेल, कृष्ण मर्दा, अमित पटेल, गगन अग्रवाल, मनोज मालू, विनीत गिडे, शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.