राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी गोपाळ समाज प्रयत्नशील

पारगाव : देश स्वतंत्र झाल्यापासून भटक्या विमुक्त जातीमध्ये गणल्या जाणाऱ्या गोपाळ समाजातील एकाही व्यक्तीला आमदारकीपर्यंत पोहचता आले नाही.विविध भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या माध्यमातून गोपाळ समाजातील नेते अशोक जाधव धनगांवकर संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ हे बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत तसेच त्यांनी अनेक भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या माध्यमातून गोर-गरीब समाजाचे काम केले असून जाधव यांना आमदारकी मिळावी यासाठी गोपाळ समाज प्रयत्नशील आहे यासाठी समाजातर्फे  राज्यभर मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व भटक्या विमुक्तांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अधिकृत ई मेल आयडीवर निवेदन पाठवून भटक्या विमुक्तांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.जाधव यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून  काम केले आहे तसेच व पक्षाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी आदिवासी, एसबिसी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेले आहेत. ते भटक्या विमुक्तांचे नेते असून,१९८८ पासून कार्यरत आहेत. 

“स्वातंत्र्याची ७३  वर्षे उलटून गेली तरीही आजपर्यंत भटक्या विमुक्तांची परवड होतच असून भटक्या विमुक्तांसाठीचे अनेक आयोग नेमले गेले व त्यांच्या शिफारसी देखील केंद्राकडे त्या त्या आयोगाने पाठवल्या परंतु त्यावर अजून कोणत्याही सरकारने निर्णय घेतला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी  अशोक जाधव धनगावकर यांना संधी देऊन भटक्या विमुक्तांना सोबत घ्यावे” अशी मागणी  गोपाळ समाजहित महासंघाचे  प्रदेशाध्यक्ष  नंदकुमार पवार यांनी केली आहे.