संविधानिक हक्कांवर महाविकास आघाडीकडून गदा; आमदार पडळकरांचा आरोप

    बारामती : पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर पडळकर यांनी केला.

    ते शनिवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पडळकर आज बारामतीच्या दौऱ्यावर असून, बारामतीच्या विविध भागात वंजारी, तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या घोंगड्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन केले. गोपीचंद पडळकर यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांच्यावर तोफ डागल्याने आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असे पडळकर यांनी म्हटले.