गोसासी गाव आदर्श रोल मॉडेल बनविणार : सरपंच संतोष गोरडे

    राजगुरूनगर : ग्रामविकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, तरीही ग्रामविकास करत असताना गोसासी गावाचे नाव तालुकास्तरावर आदर्श ग्राम व मॉडेल गाव म्हणून घ्यावे इतके काम व ग्रामविकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार सरपंच संतोष गोरडे यांनी व्यक्त केला.

    खेड तालुक्यातील पूर्वेला १० किलोमीटर अंतरावर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाच्या कुशीत वसलेले आमचे गोसासी गाव!  गावची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळपास व ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ आहे. सर्वांना सोबत घेऊन गावाने प्रथम २०१५ साली उपसरपंच व २०२१ साली सरपंच पदाची बिनविरोध संधी गावच्या विकासासाठी दिली.

    आवर्षणप्रवर्षण क्षेत्रातील एक गाव हीच आमच्या गावची ओळख आणि हीच काम करण्यासाठीची प्रेरणा! आणि गावात कुठल्याही मतदानानंतर सर्वजण सत्ताधारी व विरोधक संध्याकाळी एकत्र असतो अशी अभिमान वाटावा,अशी गावची वैचारिक बैठक व गावातील ज्येष्ठ पुढाऱ्यांनी परंपरा चालू ठेवली,असे सरपंच गोरडे यांनी सांगितले.
    अशी केली विकासकामे
    २०१५ साली सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावातील आदर्श नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एक दुष्काळग्रस्त गाव ही ओळख पुसून टाकायची. ह्याच एका ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही कामाला सुरुवात केली. जलसंधारणमध्ये दोन पाझर तलावांची दुरूस्ती, चार सिमेंट साठवण बंधारे, ५५ हेक्टरवर सलग समतल चर, चार नवीन मातीनाला बांध, व जुन्या मातीनाला बांधमधील गाळ काढणे, पक्षी व वन्य प्राणी यांच्यासाठी तीन वनतळी निर्माण केली.
    विशेष म्हणजे यांत भर उन्हाळ्यातसुद्धा पाणी असते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ३३ हजार वृक्ष लागवड व संगोपन, ग्रामविकासामध्ये गावातील जिल्हा परिषद शाळा व दोन वस्तीशाळांचा गोसासीच्या व देशाच्या भविष्यासाठी लोकसहभागातून व शासकीय निधीतून सर्वांगीण विकास, गावातील १४५० मीटरचे दोन रस्ते डांबरीकरण, व १३६६ मीटरचे विविध रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, बंदिस्त गटारीकरण, दोन अंगणवाडी इमारत तसेच आदिवासी बांधवांना शिवकालीन पाणी टाकी, सार्वजनिक कार्यक्रमासाठी शेड, २३ घरकुले, १०९ शौचालय, गावातील सर्व धार्मिक स्थळांची सुधारणा व दुरुस्ती, शोषखड्डे, शेतीपंपासाठी तीन नवीन विद्युत रोहित्र अशी अनेक विकासकामे आम्ही खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, लोकसहभाग यांच्या मदतीने मार्गी लावली.
    गावातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या मदतीने आरओप्लांटची उभारणी केली. हरिता संस्थेच्या सहकार्याने बोलकी अंगणवाडीची निर्मिती केली. नवीन स्मशानभूमी इमारत, दशक्रिया विधी घाट शेड व सुशोभीकरण गावाची शोभा वाढवितो आहे. गावातील तरुणांसाठी व्यायाम शाळा व साहित्य, नवीन ग्रामपंचायत भवन बांधकाम व हायमास्ट दिवे, एलईडी पथदिवे बसविले. ही सर्व कामे करत असताना ‘गावचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे’’अशी कार्यपद्धती गोरडे यांनी अवलंबिली.

    कोरोना काळातील दक्षता

    कोरोना महामारीत देखील विशेष काळजी घेत लोकसहभागातून जनजागृती करत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, हँड वॉश, हँड सॅनिटायझर, साबण, मास्क यांचे घरोघरी वाटप केले. गेली पाच वर्षांपासून विविध आजारांच्या उपचारासाठी कॅम्प गावामध्ये घेतले आहे व घेत आहोत. विविध संस्थांच्या मदतीने आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप केले.
    राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोर पालन करीत गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. ग्रामस्थांचे या कठीण काळात खूप सहकार्य मिळाले व भविष्यातही अशी कितीही संकटे आली तरीही आम्ही एकजुटीने गावच्या वेशीवरच राहतील गावामध्ये शिरकाव करू देणार नाही यासाठी प्रयत्न करीत राहू, अशी ग्वाही सरपंच गोरडे मोठ्या आत्मविश्वासाने देतात.

    कुटुंबाच्या भावनेतून करू गावचा विकास

    गावाने पुन्हा सरपंच पदावर काम करण्यासाठी संधी दिली असता उपसरपंच धोंडिभाऊ शिंदे, सर्व सद्यस्य व ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन गाव म्हणजे एक कुटुंब आणि कुटुंब ही आपली जबाबदारी ह्याच भावनेतून माझ्या गोसासी गावचा विकास साधायचा आहे. गावातील उर्वरित सर्व गल्लीबोळातील रस्त्याचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्ता डांबरीकरण पूर्ण करून, गावातील सर्व गटारीकरणाची कामे मार्गी लावायची आहेत. गावातील शाळा व  अंगणवाडी डिजिटल करून भविष्यासाठी सुसज्ज करायच्या आहेत.
    मुलांसाठी खेळाचे मैदान, लोकांसाठी सोलर हीटर, ग्रामस्थांसाठी बहुउपयोगी व बहुउद्देशीय इमारत, व्यायाम शाळा ही कामे मार्गी लावत असताना गावातील प्रत्येक शेतावर जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा संपवायची आहे. प्रामुख्याने आमचे गाव टँकर मुक्त झाले आहे. आता शेतीच्या पाणीसाठी टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण, गाळ काढणे, सिमेंट साठवण बंधारे, भूजल पातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम तयार केला आहे.
    – संतोष गोरडे, सरपंच, गोसासी गाव
    (शब्दांकन : अमित टाकळकर, राजगुरूनगर)