कांदलगाव ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा स्मार्टग्राम पुरस्कार

तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन २०१९-२० या वर्षासाठीचा तालुकास्तरावरचा प्रथम क्रमांकाचा स्मार्टग्राम पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात अल्पबचत भवन येथे प्रदान करण्यात आला. दहा लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

    इंदापूर : तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन २०१९-२० या वर्षासाठीचा तालुकास्तरावरचा प्रथम क्रमांकाचा स्मार्टग्राम पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात अल्पबचत भवन येथे प्रदान करण्यात आला. दहा लाख रूपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सरपंच रविंद्र पाटील,ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.स्मार्टग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक गावाची स्वच्छता, व्यवस्थापन, आर्थिकदृष्ट्या सक्षमता, अपांरपारिक ऊर्जास्त्रोत, पारदर्शकता या बाबींवर १०० गुणांकरिता ग्रामपंचायतीची तपासणी केली जाते.

    तालुकास्तरीय तपासणीमध्ये सर्वाधिक ९२गुण मिळवून कांदलगाव ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली.इंदापूर तालुक्याच्या इतिहासात सर्वप्रथम दोन ग्रामपंचायती स्मार्टग्राम स्पर्धेकरिता जिल्हास्तरावर पात्र ठरल्या त्यामध्ये कांदलगाव ग्रामपंचायतीचा समावेश होता. कांदलगाव ग्रामपंचायत आयएसओ मानांकन प्राप्त आहे. इंदापूर तालुक्यातील स्वतःचे संकेतस्थळ असणारी ही पहिली ग्रामपंचायत आहे.विविध उपक्रम,महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ कांदलगावमध्ये प्रभावीपणे राबवली गेलेली आहे. सन २०१९-२०चा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेचा तालुकास्तरावरचा प्रथम क्रमांक देखील या ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

    या संदर्भात सरपंच पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीने मिळवलेला पुरस्कार हा गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या सहकार्याचे प्रतिक आहे.पुढील काळात देखील वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न राहील.