राज्यपाल हे केंद्रांचे पोलिटिकल एजंट : संजय राऊत

खेडचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या परिवाराने राऊत यांची भेट घेऊन खेड प्रांताधिकारी यांनी जात पडताळणीबाबत चुकीचा निर्णय दिल्याची माहिती दिली. या संदर्भात मी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गैर केली जाणार नाही असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

  राजगुरुनगर : महाराष्ट्राचे राज्यपाल हे अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांनी भाजपाकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार ही पदे भूषविली आहेत. त्यामुळे ते भाजपला हवे तसे करतात. यामुळेच ते केंद्र सरकारचे पोलिटिकल एजंट आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यानी केला.

  राऊत यांनी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना हॉटेल व्हिट्स सागर प्लाझा येथे शनिवारी (दि. ४) रात्री पत्रकार परिषदेत पक्षाची सडेतोड भूमिका मांडली. राज्यपालांकडून १२ राज्यपाल नियुक्त आमदार निवडीला होत असलेल्या विलंबाबाबत राऊत यांनी राज्यपालांना जवाबदार धरले.

  शिवसेना पाठीमागून वार करीत नाही तर समोरूनच कोथळा बाहेर काढत असतो, असे प्रत्युत्तर राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या “शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला’ या टीकेवर दिले.

  राहुल गांधी यांच्या जीडीपी वाढल्याचा वक्तव्याचे राऊत यांनी समर्थन केले. देशात महागाईचा वणवा पेटला आहे. गॅस, डिझेल व पेट्रोलचे दर वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून तरुण आत्महत्या करीत आहेत. अनेक युवतींना आपल्या पालकांवर असलेल्या आर्थिक ताणामुळे दडपण आले आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.

  जी लोकं उध्दव ठाकरे यांना ओळखतात, त्यांना माहिती आहे की ते कोणावरही सूडबुद्धीने कारवाई करीत नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया झाली आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.

  मृत्यूनंतर वैर संपते. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे वागणे माणुसकीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांचे नाव घेतल्यावर राष्ट्रवादीतील नेते कुत्सिक हसतात, यावरून त्यांची प्रतिमा लक्षात येते. खेडमधील अन्यायकारक घडामोडींबाबत मी सातत्याने गृहमंत्र्यांशी संपर्क करीत असतो, असे सूचक वक्तव्य केले.

  खेडचे माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या परिवाराने राऊत यांची भेट घेऊन खेड प्रांताधिकारी यांनी जात पडताळणीबाबत चुकीचा निर्णय दिल्याची माहिती दिली. या संदर्भात मी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची गैर केली जाणार नाही असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

  याप्रसंगी संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, अशोक खांडेभराड व शरद सोनवणे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट व रुपाली कड, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे व ज्योती आरगडे व सेना पदाधिकारी उपस्थित होते.