उरुळी कांचनमध्ये तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय ; कोरोनाचा  वाढता संसर्ग व त्याचा धोका विचारात  घेऊन निर्णय

उरुळी कांचन शहरात चालू ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ५७ वर जाऊन पोहचली आहे. तर मागील दोन तीन दिवसांत ४७ च्या वर रुग्ण आढळल्याने शहरात संसर्ग धोका वाढला आहे.

    उरुळी कांचन : उरुळी कांचन शहरात मागील दोन तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ४७ च्या आसपास  आढळून आल्याने व शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेत ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात शनिवार (दि.२०) ते सोमवार (दि.२२) मार्च २०२१ पर्यंत ३  दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली, पुढील चार दिवसांत सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत व्यवहार सामान्य पणे चालू ठेऊन दुपार १ नंतर व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात  आरोग्य विषयक अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

    उरुळी कांचन शहरात चालू ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ५७ वर जाऊन पोहचली आहे. तर मागील दोन तीन दिवसांत ४७ च्या वर रुग्ण आढळल्याने शहरात संसर्ग धोका वाढला आहे. शहरातील आश्रमरस्ता ,तुपे वस्ती व दत्तवाडी परिसरात रुग्ण वाढीची स्थिती चिंताजनक बनली आहे. तसेच या  ठिकाणी रुग्ण बरे होऊन पुन्हा वाढत असल्याने रुग्णांची साखळी तुटत नसल्याने शहरात कोरोना वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली. बैठकीत शहरात प्रतिबंधात्मक उपाय न पाळणाऱ्या व्यक्ती , व्यावसायिक यांच्यावर थेट गुन्हे दाखल करणे अथवा दंडात्मक कारवाई करुन नियामनुसार दुकाने सील करण्याचे ठरले असुन  सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन निर्देशानुसार ५० हून अधिक नागरीकांची उपस्थिती असल्यास कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

    उरुळी कांचन शहरात वाढत्या रुग्ण संख्येवर उपाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीच्या स्वरुपात बैठक गुरुवार ( दि.१८) ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या सभेच्या अध्यक्षस्थानी हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा.के.डी. कांचन होते. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या डॉ.सुचिता कदम,डॉ.संदीप सोनावणे, दत्ता जांभळे, महसूलच्या वतीने तलाठी प्रदीप जवळकर, पोलिसांच्या वतीने महेंद्र गायकवाड, संदीप पवार, पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, अमित कांचन, मयूर कांचन,सुनिल तांबे,शंकर बडेकर, माजी सरपंच दत्तात्रय कांचन आदी उपस्थित होते, यावेळी या बैठकीत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन ही रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने शहरात शनिवार ( दि.२०) ते सोमवार (दि.२२) पर्यंत कडकडीत बंद तर मंगळवार (दि.२३) ते शुक्रवार (दि.२६) पर्यंत व्यवहार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत चालू ठेऊन त्यानंतर बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.