तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कपातीस विरोध

  शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत प्रशासनाने पगार कमी केल्याने कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला असून, पगार पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
  तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार गेली वर्षभर कोरोना काळात दिवसरात्र काम करून देखील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायतीने पगार कमी केला आहे. वास्तविक, बहुतांश कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षांपर्यंत झाली आहे. तरीदेखील ९ हजार २०० एवढ्या तुटपुंज्या मूळ पगारावर काम करणाऱ्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा २ हजार रुपयांनी पगार कमी केला आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांचा पगार ३ हजाराने कमी केला आहे.
  ग्रामपंचायतीने खोटा ठराव करून पगार कपात केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी निवेदनात केला आहे. तर १७ पैकी ९ ग्रामपंचायत सदस्यांनीही कर्मचाऱ्यांच्या आरोपाला दुजोरा देत निवेदनावर सह्या केल्या आहेत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत सुरू करावा व कोणतीही पगार कपात करू नये व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
  पगार कपातीबाबत कर्मचाऱ्यांना कल्पना
  ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव करून सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. पगार कपातीबाबतची कर्मचाऱ्यांनाही कल्पना देण्यात आली होती, असे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी सांगितले.
  एप्रिल २०२१ च्या मासिक सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार मे २०२१ पासूनच कर्मचाऱ्यांच्या पगार कमी केला आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत घरपट्टी वसूल होत नसल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने पगार कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनाही पगार कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढविण्यात येईल, असे तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ यांनी सांगितले.