Crime

    शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्ती येथे जमिनीच्या वादातून नातवानेच आजोबाचा खून केला असल्याची घटना ६ जुलै रोजी घडली. शंकर कृष्णराव ताथवडे असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    केंदूर ता. शिरुर येथील ताथवडे वस्ती येथील शंकर ताथवडे यांचे त्यांच्याच नात्याने पुतण्या असलेल्या भरत उर्फ बबलू चौधरी यांच्यात जमिनीच्या कारणातून वाद सुरु आहेत. सध्या ताथवडे यांनी शेतात सोयाबीन लावल्याने शेतात अन्य जनावरांनी पिकांची नासाडी करू नये म्हणून त्यांनी शेताचे कडेने काटे लावलेले होते. त्यामुळे ६ जुलै रोजी चिडून भरत उर्फ बबलू हा ताथवडे यांच्या घरी गेला आणि त्याने घरी जाऊन दरवाजा जबरदस्तीने उघडला. ताथवडे यांच्या घरात प्रवेश करून शंकर ताथवडे यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. त्यात जखमी केले. त्याने घरातील टेबल पंखा तसेच चौरंगानेही शंकर ताथवडे यांना बेदम मारहाण करत ठार मारले.

    दरम्यान, शंकर ताथवडे यांची पत्नी निर्मला ताथवडे या मध्ये आल्या. तेव्हा बबलू याने त्यांना देखील डोक्यात व हातांवर मारहाण केली. या घटनेमध्ये शंकर कृष्णराव ताथवडे (वय ६९ वर्षे रा. केंदूर ताथवडे वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.

    याबाबत निर्मला शंकर ताथवडे (वय ५५ वर्षे रा. केंदूर ताथवडे वस्ती ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी रा. केंदूर जैन मंदिर जवळ ता. शिरुर जि. पुणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी भरत उर्फ बबलू चौधरी हा फरार झाला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.