कृषि उद्योजकांना ग्रामीण भागात मोठी संधी : उद्योगमंत्री सुभाष देसाई

राहुरी : भारताची ६५ टक्के लोकसंख्या ही मुख्यत्वे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भाजीपाला तसेच फळ पिकांचे ३० टक्के नुकसान हे योग्य काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या

राहुरी : भारताची ६५ टक्के लोकसंख्या ही मुख्यत्वे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भाजीपाला तसेच फळ पिकांचे ३० टक्के नुकसान हे योग्य काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या सुविधेअभावी होते. यामुळे दरवर्षी आपल्या देशाचे करोडो रुपयांचे नुकसान होते. प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात कृषि प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यास हे नुकसान कमी होऊन शेतमालाला चांगला भाव मिळेल. प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी लागणारी जमीन, कच्चा माल ग्रामीण भागात कमी दराने उपलब्ध आहे म्हणुन तरुण उद्योजकांनी शेहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करावाण्यासाठी मोठी संधी आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम व मराठी भाषेचे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत स्मार्ट अन्न प्रक्रियाचे प्रगत तंत्रज्ञान  या विषयावरील दोन आठवड्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सुभाष देसाई बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. नारायणसिंग ठाकोर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. विक्रम कड आदी उपस्थित होते.

सुभाष देसाई पुढे म्हणाले की, आपल्या राज्यात सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र सरकारने राज्यात आठ मेगा फुड पार्क तसेच ६०० पेक्षा जास्त मार्केट पार्क सुरु केले आहेत. महाराष्ट्रात शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या सोई सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामध्ये कृषि क्षेत्रातील नविन उद्योजकांना शेतमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये खुप मोठा वाव आहे. कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले की,  विद्यापीठाने आतापर्यंत विविध फळांच्या तसेच भाजीपाला पिकांच्या विविध जाती संशोधित करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यामध्ये बहुमूल्य कामगिरी केलेली आहे. शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले तरच सर्व सामान्य शेतकऱ्यांचा फायदा होईल. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी फुड पार्कचा मोठा सहभाग राहणार आहे.