अजित पवारांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा झेंडा; ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रोची पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. आज सकाळी 7 वाजता ट्रायल रन पार पडली. वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर मेट्रो धावली. या 100 मीटर मार्गावर चाचणी झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

    पुणे : पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रोची पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. आज सकाळी 7 वाजता ट्रायल रन पार पडली. वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर मेट्रो धावली. या 100 मीटर मार्गावर चाचणी झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पहिल्यांदा ट्रायल रन होणार असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.

    अजित पवारांनी रिमोटनं मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास पुणे मेट्रो धावली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले?

    यावेळी अजित पवार यांनी म्हटलं की, सरकार कोणाचं आहे हे जनता ठरवते. निवडणूकीनंतर विकास महत्वाचा या विचारानं सगळे एकत्र येऊन काम करतो आहोत. पुण्याला काहीही कमी पडू देणार नाही. अनेक प्रकारची विकासकामे भविष्यात प्रस्तावित केली आहेत. 75 हजार कोटी रूपयांचा विकास आराखडा आहे. दरम्यान, विकासाच्या कामात राजकारण आणलं नाही. याचं पुणे मेट्रो हे उदाहरण आहे. वनाझ ते गरवारे कॉलेज टप्पा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुरू होईल असं पुणे मेट्रोच्या ब्रजेश दिक्षितांनी सांगितलं असल्याचंही महापौर मुरलीधर मोहोळ सांगितलं.

    याआधी 7 जुलै रोजी वनाज ते रामवाडी या भागाची रात्रीच्या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. आज कोथरूड ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली.