‘शक्ती’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची हमी द्या ; भाजपा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांची मागणी

पिंपरी : बालिका, महिला, तरुणींवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात ‘दिशा’ सारखा प्रभावी कायदा लागू करावा, ही भाजपा महिला मोर्चाची अनेक दिवसांपासून मागणी राज्यातील आघाडी सरकारने उशीरा का होईना मान्य आहे.

पिंपरी : बालिका, महिला, तरुणींवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात ‘दिशा’ सारखा प्रभावी कायदा लागू करावा, ही भाजपा महिला मोर्चाची अनेक दिवसांपासून मागणी राज्यातील आघाडी सरकारने उशीरा का होईना मान्य आहे. आता या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.

प्रदेशाध्यक्षा खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बालिकांवरही अमानवी अत्याचार झाले. या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने विविध माध्यमांद्वारे सातत्याने केली आहे. महिलांवरील अत्याचाराकडे राज्य शासनाचे लक्ष वेधावे, यासाठी महिला मोर्चातर्फे राज्यभर आक्रोश आंदोलन केले गेले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. राज्यात लॉकडाउनच्या काळात विलगीकरण केंद्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, विनयभंगाचे प्रकार घडले. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी महिला मोर्चाने विलगीकरण केंद्रासाठी एसओपी लागू करा, अशी मागणी केली होती.

राज्यभर आंदोलन करुनही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी कायदा लागू केला जात नव्हता. अलिकडेच राज्य सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्यास विलंब झाला असला तरी महिला मोर्चा या कायद्याचे स्वागत करीत आहे. राजकीय दबावामुळे अशा घटनांतील कोणाही आरोपीची सुटका होवू नये. यासाठी राज्य सरकारने कोणाला दयामाया न दाखविता या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे, असेही प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी म्हटले आहे.