मका उत्पादक शेतकऱ्यांना पीक कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका पीक कीड नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांने मका पीक वाचवण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन तसेच माहिती देऊन जनजागृती

मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका पीक कीड नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांने मका पीक वाचवण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन तसेच माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कामगंध सापळे, कीटकनाशक औषधांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मका पीक संकटात सापडले आहे. तालुका कृषी अधिकारी टी. के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचे कर्मचारी प्रादुर्भावग्रस्त शेतास भेट देऊन कामगंध सापळे व औषधांचे वाटप करून कसे वापरायचे व अळीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. लौकी येथील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रावरील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता तालुका कृषी कार्यालयाने मोहीम सुरु केली आहे.

-वेळोवेळी फवारणी केली तरच पीक वाचणार

कृषी कार्यालयाकडून एकात्मिक कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना औषधे व कामगंध सापळे भेट देण्यात आले. मक्याच्या एका रोपट्यात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत आहेत. या भागातील मका पिक दीड महिन्याचे झाले आहे. अडीच महिन्यात मका पीक तयार होते. वेळोवेळी फवारणी केली तरच पीक वाचणार आहे. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. पिकातील या अळीचा कसा प्रतिकार करायचा याबाबत कृषी सहाय्यक दिपाली धिमते यांनी मार्गदर्शन केले.