आळेफाटा परिसरात गुटखा विक्री जोमात

बेेेल्हे: बंदी असतानाही आळेफाटा परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असून,याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, सरकारने कानाडोळा केल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात आघाडी सरकारच्या काळात गुटखाबंदी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कठोरपणे राबविण्यात आली. परंतु त्यानंतर आळेफाटा परिसरात चिरीमिरी सुरू झाली आणि संबंधित यंत्रणेला त्याची सवय झाली. परंतु नवी उमेद घेऊन वयात येणारी तरुणाई याला स्टेटस सिम्बॉल म्हणू लागली व हीच बाब तेथेच गंभीर होऊ लागली. बंदी असताना आळेफाटा येथे राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. ती संबंधित प्रशासनाला ठाऊक नाही असेदेखील नाही.पण तराजूत समान वजन पडल्या नंतर ते बरोबरीत सुटतं त्याच पद्धतीने पुड्या खाऊन रस्ते आणि भिंतीचे कोपरे लाल करण्याचे काम सुरू आहे. स्वत:ला गुटखा किंग संबोधणाऱ्यांनी मात्र यंत्रणा आमचीच असल्याचा डिंगोरा सगळीकडे पिटला जात आहे. आघाडी सरकारने केलेली बंदी युती सरकारने कायम ठेवली. पण रस्त्यांवर दिसणाऱ्या रिकाम्या पुड्या वाढत गेल्याची बाब समोर आली आहे. आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. अजित पवारांनी कडक शब्दात गुटखाबंदी केली त्यांनीच मागच्या आठवड्यात त्याला मोक्का कायद्या चे कवच दिले आहे. परंतु खालची यंत्रणा मात्र पूर्णपणे पक्की झाल्याने सदर कायद्यालादेखील केराची टोपली दाखवली जाते की काय,अशी शक्यता आहे. गुटख्यामुळे परिसरात तरुणाई कर्करोगाच्या विळख्या त आहे.त्यांचे पारिवारिक व आर्थिक संतुलन पूर्णपणे कोसळून गेले आहे. गुटखाबंदीला लागलेले ग्रहण हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुटलेले नाही.