हिंजवडीत ४३.८० लाखाचा गुटखा जप्त ; सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई

पिंपरी :आयटी पार्क मुळे जगभरात लौकिक मिळविलेल्या हिंजवडी परिसरातून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका टेम्पोवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी रजनीगंधा, विमल यासह अन्य गुटखा, वाहने असा तब्बल ४३ लाख ८३ हजार ७१४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पिंपरी : आयटी पार्क मुळे जगभरात लौकिक मिळविलेल्या हिंजवडी परिसरातून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका टेम्पोवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी रजनीगंधा, विमल यासह अन्य गुटखा, वाहने असा तब्बल ४३ लाख ८३ हजार ७१४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी पारसराम चौथाराम मेघवाल (४५), ललित गोविंदराम खारोल (२३, दोघे राहणार साखरे वस्ती रोड, हुलावले बेंद्रे वस्ती, आईटी पार्क फेज १, हिंजवड़ी, पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेे आहे. प्रमुख आरोपी शाम शंकरलाल चौधरी (३२) हा पळून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. हिंजवडी परिसरात गुटखा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी सुरू केली. त्या तपासणीमध्ये पोलिसांना एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा आढळला. या कारवाईत पोलिसांनी परशुराम आणि ललित या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जितो पिकअप, इको व्हॅन, रजनीगंधा, विमल, आरएमडी गुटखा, तंबाखू असा एकूण ४३ लाख ८३ हजार ७१४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींसोबत या प्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याबाबत माहिती काढली जात आहे. तसेच आरोपींकडून गुटखा विकत घेणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे. सामाजिक सुरक्षा पथकाला अवैध धंद्यांची माहिती मिळते. त्यांच्याकडून कारवाई देखील केली जाते. मात्र, स्थानिक पोलिसांना याचा मागमूस देखील लागत नाही. याबाबत स्थानिक पोलिसांना मेमो दिला जाणार आहे. तुम्हाला याबाबत का माहिती मिळाली नाही, याबाबत त्यांना विचारणा केली जाईल. तसेच यापुढे जर परिसरात गुटखा किंवा अवैध धंदे आढळून आले तर त्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची राहणार आहे, असेही आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

सदरची कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विट्ठल कुबड़े, सहायक निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशील सोलंके, सहायक फौजदार विजय कांबळे, हवालदार सुनील शिरसाठ, नितिन लोंढे, अनिल महाजन, अमोल शिंदे, वैष्णवी गावड़े, मारुति करचूंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, योगेश तिडके यांनी केली आहे.