बारामतीत ५२ वर्षीय महिलेची कापली जट; अंनिसचा पुढाकार

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरात ५२ वर्षीय महिलेने अंधश्रद्धेपोटी २० वर्षापासून राखलेली जट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‌कापून त्या महिलेची जटेतून मुक्तता केली. बुधवारी (दि. १४) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुढाकार घेतला. संगिता मोरे असे या महिलेचे नाव आहे.

    गेल्या २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून संगिता मोरे यांनी या जटा राखल्या होत्या. अजूनही अंधश्रद्धेतून अथवा देव-देवतांच्या नावे जटा राखल्या जातात. या जटांच्या भारामुळे संबंधित व्यक्तिला शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अंनिसने या अनिष्ठ प्रथेविरोधात गेल्या काही वर्षांपासून काम सुरु केले आहे. बारामतीतील मोरे यांनी २० वर्षांपासून राखलेल्या जटातून त्रास होत असल्याने त्या काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार जटा उतरविण्यात आल्या आहेत.

    याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारीणी सदस्य नंदिनी जाधव म्हणाल्या, अंनिसने राज्यभर फिरून आजवर १९६ महिलांची जटेतून मुक्तता केली आहे. ६ महिने ते ५० वर्षांपर्यंत वाढलेल्या जटा संबंधिताचे समुपदेशन करून, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा, भीती दूर करून काढल्या आहेत. बारामतीत बुधवारी जटा काढलेल्या संगीता मोरे या १९७ व्या महिला आहेत. यापूर्वी १९६ महिलांच्या जटा काढल्या आहेत. यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे यावेळी शहरातील काही तृतीयपंथीय देखील उपस्थित होते.