ससून रुग्णालयात म्युकर मायकोसिस लागण होऊन उपचार घेणारे निम्मे रुग्ण पुणे विभागाच्या बाहेरचे

पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश होतो. ससून रुग्णालयात या भागातील तसेच नगर जिल्ह्यासोबतच जळगाव, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी, अलिबाग, उस्मनाबाद, अंबेजोगाई, अकोला येथूनही 'म्युकरमायकोसिस' झालेले रुग्ण येत आहेत.

    पुणे: कोरोनानंतर राज्यात मोठ्याप्रमाणात म्युकरमायकोसिसच्या आजाराची लागण लोकांना होताना दिसून आली आहे. पुणे शहरातील ससूनरुग्णालयामध्ये ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होऊन दाखल झालेले सुमारे निम्मे रुग्ण हे पुणे विभागाच्याही बाहेरचे आहेत. सध्या यांची संख्या सुमारे ५० च्या जवळपास असून, रोज दाखल होणाऱ्या १० रुग्णांमध्ये दोन-तीन रुग्ण तरी पुणे विभागाच्याही बाहेरचे आहेत.

    पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांचा समावेश होतो. ससून रुग्णालयात या भागातील तसेच नगर जिल्ह्यासोबतच जळगाव, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी, अलिबाग, उस्मनाबाद, अंबेजोगाई, अकोला येथूनही ‘म्युकरमायकोसिस’ झालेले रुग्ण येत आहेत.

    यातील अनेक रुग्णांची स्थिती ही अतिशय गंभीर असते. या रोगाची लागण झाल्यानंतर तेथे स्थानिक पातळीवर त्यांनी उपचार केलेले असतात. त्यात त्यांच्या शस्त्रक्रियाही केलेल्या असतात. त्यामुळे आधीच डोळा, जबड्याचा काही भाग काढून टाकलेले असतात. तेथे पुढील उपचार करणे शक्‍य होत नाही, अशा परिस्थितीत ते ससूनमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे अवघड जाते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

    सध्याच्या सुमारे ४७ ते ५० रुग्ण हे पुणे विभागाबाहेरच्या मोठ्या शहरांमधून ससूनमध्ये आले आहेत. यातील अनेक रुग्णांवर आधीच त्यांच्या गावात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही संसर्ग वाढल्याने ते पुढील उपचारासाठी ससूनमध्ये आले आहेत. त्यांच्यावर सध्या येथे औषधोपचार सुरू आहेत.
    – डॉ. समीर जोशी, कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि विभागप्रमुख, ससून रुग्णालय