बारामतीत अतिक्रमणांवर हातोडा; बसस्थानकाच्या आरक्षित जागेवरील बांधकामे हटविली

  बारामती : शहरातील काटे हॉस्पिटल लगत असलेल्या बारामती बस स्थानकाच्या आरक्षित जागेवर केलेल्या अतिक्रमणावर बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.

  हार्डवेअर दुकान, गॅरेज, ऑफिस उभारले

  सध्या बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारामती बस स्थानकाच्या सुसज्य इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. कृष्ण दृष्टी हॉस्पिटल लगत बारामती बसस्थानकाची आरक्षित जागा आहे. या जागेवर शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी हार्डवेअर दुकान, गॅरेज व ऑफिस उभारले होते. या अतिक्रमणधारकांना नगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बारामती नगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. ४) सकाळी आठ वाजता जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली.

  परिसराने घेतला मोकळा श्वास

  यावेळी मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्यासह अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर, सुनील धुमाळ, महेश आगवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अभियंता रमेश मोरे, रोहित पाटील, अतुल तोरस्कर आदींसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.बारामती बस स्थानकाच्या नियोजित इमारतीच्या बांधकामानंतर या ठिकाणाहून एसटी बस बाहेर जाण्याचा हा मार्ग आहे. त्याठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आल्याने परिसराने मोकळा श्वास टाकला आहे.

  दुकानदाराचा कारवाईला विराेध

  सुरुवातीला अतिक्रमण केलेल्या गोंजारी यांनी या कारवाईला विरोध केला. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष तोडकर यांनी जागा बस स्थानकासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट करून याबाबतची नोटीस वाचून दाखवली. यानंतर जेसीबीच्या साह्याने हार्डवेअर दुकान, ऑफिस यासह तीन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान या दुकानांमध्ये असलेले ३० ते ४० लाखांचा माल कारवाई करण्यापूर्वी दुकान मालकाने बाहेर काढला.