पुरंदरमध्ये दिव्यांगांना मिळाले स्मार्टकार्ड; एसटीतून प्रवास करताना होणार फायदा

    सासवड : राज्यातील दिव्यांगाना विविध पासेस मिळवण्यासाठी अनेक कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता केंद्र शासनाने हे सर्व पास बंद करून एकच स्मार्टकार्ड देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यामुळे एकाच प्रकारचे कार्ड सर्व ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी एसटी महामंडळाकडून सुरु करण्यात आली. राज्यात या उपक्रमाची सुरुवात पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथील एसटी आगारात करण्यात आली. यावेळी पुरंदरमधील ७५ दिव्यांगाना स्मार्टकार्ड वितरीत करण्यात आले.

    केंद्र सरकारच्या २०१६ च्या कायद्यानुसार वैश्विक ओळखपत्रावर एसटी प्रवासाचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने ६ मार्च २०२१ रोजी सर्व ३६ जिल्ह्यांना विविध २१ प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना स्मार्टकार्डची नोंदणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्यास एसटी महामंडळाने सुरुवात केली असून, यासाठी दिव्यांगाना आधारकार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असल्याचे सासवड आगाराच्या आगारप्रमुख मनिषा इनामके यांनी सांगितले.

    यावेळी प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू, सचिव गणेश भुजबळ, वाहतूक नियंत्रक कैलास जगताप, महेश भोंगळे, गणेश कामथे, तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.

    दिव्यांगांसोबत असलेल्या व्यक्तीस ५० टक्के सवलत

    या अंतर्गत दिव्यांगाना ७५ टक्के सवलत देण्यात आली असून, ६० ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या सोबतीस ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यासोबत कार्यप्रणाली एसओपीसोबत जोडण्यात आली आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातील दिव्यांगांना ३१ मार्च २०२१ च्या परिपत्रकानुसार स्मार्टकार्ड मिळण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत दिली असून, १ ऑक्टोंबर २०२१ पासून हे स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

    शासनाने दिव्यांगांची फरफट थांबवली : जगताप

    शासनाने दिव्यांगांना एकाच प्रकारचे स्मार्टकार्ड देऊन त्यांची होणारी फरफट थांबवली आहे. यामुळे दिव्यांगाना फारसा त्रास होणार नाही. कोरोनाचे सावट कमी होताच पुरंदरमध्ये ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचा कॅम्प लावण्यात येईल. तरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.