हर्षवर्धन पाटील यांनी भाटनिमगाव बंधारा दुष्काळी निधीतून बांधला ! दुसरे श्रेय घेत असल्याचा भाजपचा आरोप

युतीच्या काळात बंधाऱ्याची उभारणी

    भाटनिमगाव : भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात इंदापूर तालुक्यात भीमा व नीरा नदीवरती अनेक बंधारे दूरदृष्टी ठेवून बांधले. यामध्ये भीमा नदीवर भाटनिमगाव येथील बंधारा हर्षवर्धन पाटील यांनी युती शासनाच्या काळात १९९९ मध्ये दुष्काळी आपत्कालीन उपाययोजनांमधून खास बाब म्हणून मंजूर करून घेतला व पाठपुरावा करून बंधारा बांधला.

    त्यावेळी कॅबिनेटने दुष्काळी परिस्थितीवरती कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी एक उपसमिती प्रधान सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. त्या समितीकडे हर्षवर्धन पाटील यांनी पाठपुरावा करून दुष्काळी उपाययोजनांमधून या बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला.

    मंजुरी घेतल्यानंतर बंधाऱ्याचे भूमिपूजन तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री अजितव घोरपडे यांच्या हस्ते व तत्कालीन कृषी राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आ.बबनदादा शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. या बंधाऱ्यामुळे इंदापूर व माढा तालुक्यातील भीमा नदी काठची शेती सुजलाम-सुफलाम झाली, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर व नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे यांनी दिली.

    हर्षवर्धन पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दुरुस्तीसाठी पाठपुरावा

    भाटनिमगाव बंधारा गेल्या काही वर्षांपासून काहीसा नादुरुस्त झाला, बंधारा लवकर कोरडा पडू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या बंधाऱ्याची पाहणी केली. या दोन नेत्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी इस्टीमेंट तयार करून प्रस्ताव पाठविला. पुढे या दुरुस्तीच्या प्रस्तावाचा या नेत्यांनी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला आणि तो मंजूरही करून घेतला. मात्र आता निधी उपलब्ध होताच बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे श्रेय दुसरेच घेत आहेत, असे सुरेश मेहेर व दादासाहेब घोगरे यांनी सांगितले.