हर्षवर्धन पाटील यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी आकर्षक : लालासाहेब पवार

    बावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे राज्यातील एक संस्कारक्षम व अभ्यासू नेते आहेत. त्यांचे नेतृत्व विकासाभिमुख असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आकर्षक असे आहे, असे प्रतिपादन नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी शनिवारी (दि.21) शहाजीनगर येथे केले.

    नीरा-भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण, आरटीपीसीआर तपासणी, केक कापणे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आदी कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून लालासाहेब पवार बोलत होते.

    राज्यात 20 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करीत असताना हर्षवर्धन पाटील यांनी आपले प्रभावशाली नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व दूरदृष्टीचे असून राज्यातील सहकार क्षेत्रातील ते ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. इंदापूर तालुक्यात त्यांनी तालुका पातळीवरील विविध संस्था उभारून हजारो कुटुंबांना उभे केले आहे. येणारा काळ हा हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भरभराटीचा व अतिशय प्रगतीचा असणार आहे, असे लालासाहेब पवार यांनी भाषणात नमूद केले.

    याप्रसंगी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांची हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. यावेळी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, कमाल जमादार, माणिकराव खाडे, महादेव शेंडगे, के.एस.खाडे, डॉ.विनोद पवार, डॉ.संतोष खाडे, अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.