एच. सी. एम.टी.आर रस्ता :निधीच्या पर्यायांचा विचार करा

- बागुल यांची मागणी पुणे : गेल्या ४० वर्षांपासून प्रस्तावित असलेला आणि भविष्यातील पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार एच. सी. एम.

  – बागुल यांची मागणी  



पुणे :
गेल्या ४० वर्षांपासून प्रस्तावित असलेला आणि भविष्यातील पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या  उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार एच. सी. एम. टी. आर मार्गाबाबत पालिका प्रशासनाचा पुन्हा एकदा गलथानपणाचा कारभार सुरु झाल्याने हा  महत्वाकांक्षी प्रकल्प लांबणीवर पडणार तर आहे शिवाय  जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांना मरणाच्या खाईत लोटण्याचाच  हा प्रकार आहे,अशी भूमिका  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

तसेच या मार्गासाठी निधीच्या पर्यायांचा विचार पालिका प्रशासनाने करावा आणि कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा ;अन्यथा न्यायालयीन लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  यावेळी माजी उपमहापौर  बागुल म्हणाले कि, मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोडसाठी  (एचसीएमटीआर)     शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १९८७च्या विकास आराखड्यामध्येही (डीपी) ‘एचसीएमटीआर’ दर्शविण्यात आला होता. राज्य सरकारने २०१७मध्ये मंजुरी दिलेल्या विकास आराखड्यावर ‘एचसीएमटीआर’ची आखणी (अलाइनमेंट) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा काढल्या मात्र त्या अबोव्ह आल्या आहेत. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव याचा आधार घेऊन हा मार्ग करण्याची आमची क्षमता नाही, ही पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची भूमिका नक्की कोणाच्या हिताची  आहे ? हा प्रश्नही  महत्वाचा आहे.



गेली १९ – २० वर्षे एचसीएमटीआर रस्त्यासाठी मी स्वतः  पाठपुरावा करीत आहे.  निविदा प्रक्रियेपर्यंत आलेल्या या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  निधीचा मुद्दा उपस्थित करून  लांबणीवर टाकण्याची भूमिका एकप्रकारे पुणेकरांना मृत्यूच्या खाईत लोटणारी अशीच आहे.प्रशासनाच्या गलथानपणामुळे ही स्थिती ओढवली आहे. ज्यावेळी हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला, त्यावेळी तो केवळ पाचशे कोटी रुपयात साकारणार होता मात्र प्रशासकीय गलथान कारभारामुळे  आज हा प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.