अजित पवारांचे आर्थिक अधिकार काढण्याचे ‘यांनी’ दिले आदेश

स्पर्श हॉस्पिटलला तीन कोटी १८ लाखांचे बील अदा करणे, कोवीड केअर सेंटरच्या निविदा प्रक्रियेत कागदपत्रे परस्पर बदलणे, बँकेच्या खात्यावर लाच घेणे या विषयांवर घमासान चर्चा झाली.  अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर नगरसेवकांनी गंभीर आरोप केले. त्या आरोपांची दखल घेत महापौर उषा ढोरे यांनी पवार आणि रॉय या दोघांचे सर्व अधिकार तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले.

  पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागांकडील निविदा विषयक आर्थिक, कोरोनाची बीले अदायगी संदर्भातील संपूर्ण अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडे केवळ प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज देण्यात आले आहे. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनीही केवळ प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज करावे, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
  नुकत्याच झालेल्या महासभेत स्पर्श हॉस्पिटलला तीन कोटी १८ लाखांचे बील अदा करणे, कोवीड केअर सेंटरच्या निविदा प्रक्रियेत कागदपत्रे परस्पर बदलणे, बँकेच्या खात्यावर लाच घेणे या विषयांवर घमासान चर्चा झाली.  अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर नगरसेवकांनी गंभीर आरोप केले. त्या आरोपांची दखल घेत महापौर उषा ढोरे यांनी पवार आणि रॉय या दोघांचे सर्व अधिकार तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी करत आयुक्तांनी दोघांचे अधिकार काढून घेतले आहेत.त्याचा आदेशही तातडीने जारी केला आहे.

  अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे १७ विभागांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या या सर्व निविदा प्रक्रिये विषयक कामकाज रद्द करण्यात आले आहे. यापुढे त्यांच्याकडील सर्व विभागांचे निविदा विषयक कामकाज संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांमार्फत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर केले जाणार आहे. पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विभागप्रमुखांनी यापूर्वी लेखा आणि प्रशासन विभागाने प्रदान केलेले अधिकार त्यांच्या कार्यकक्षेपुरते वापरावेत. त्यापुढील अधिकारा संदर्भातील कामकाजाच्या नस्ती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर कराव्यात. निविदा विषयक कामकाज रद्द केल्याने पवार यांनी सोपविण्यात आलेल्या विभागांचे उर्वरीत प्रशासकीय कामकाज करावयाचे आहे. अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याकडे कोविड १९ विषयक सोपविण्यात आलेल्या कामकाजासंदर्भातील निविदा विषयक तसेच बीले अदायगी संदर्भातील संपूर्ण कामकाज काढून घेतले आहे. अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्याकडे हे कामकाज देण्यात आले आहे.

  डॉ. अनिल रॉय यांच्याकडे कारकुनी काम

  आरोग्य, किटकनाशक, स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानाकडील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना प्रदान केलेले सर्व आर्थिक अधिकार पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना प्रदान करण्यात आले होते. आता पवार यांचेही निविदा प्रक्रीयेविषयक कामकाज काढून घेतले आहे. या विभागांचे सर्व निविदा विषयक कामकाज आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. आरोग्य कार्यकारी अधिकाNयांनी यापूर्वी लेखा आणि प्रशासन विभागाने प्रदान केलेले अधिकार त्यांच्या कार्यकक्षेपुरते वापरावेत. त्यापुढील अधिकारा संदर्भातील कामकाजाच्या नस्ती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे सादर कराव्यात. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज करावे असे आदेशात म्हटले आहे.