उसने पैसे परत मागितल्याने तरुणीला गॅलरीतून फेकले

पुणे : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका तरुणीला पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे घडली. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

 पुणे : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका तरुणीला पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना हडपसर येथे घडली. यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटकही करण्यात आली आहे. सागर भीमराव तुपे (वय ३१, रा. सतरानळी, हडपसर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. २६ वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर याने एका तरुणीकडून ४० हजार रुपये हातउसने घेतले होते. परंतु, तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी (दि.४) सागर संबंधित तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्या तरुणीने त्याला पुन्हा पैशाची मागणी केली असता चिडून जाऊन त्याने तिच्याशी वाद घातला आणि तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यामुळे त्या तरुणीने याची तक्रार आपल्या बहिणीकडे केली. त्यामुळे चिडून सागरने त्या युवतीला पहिल्या मजल्यावर असलेल्या घरातून तिला खाली ढकलले. यात फिर्यादी तरुणीचा डावा पाय, मणका, खुबा फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी सागरला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव करीत आहेत.