आरोग्य सेविका मेघना मैड बनल्या देवदूत!

कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव , सतत पावसाची रिपरिप शेतातील वस्तीवरून बाहेर पडणे मुश्किल नाही स्वतः चे वाहन ना मनुष्य बळ ,नाही पैसा आडका नाही प्रवासासाठी एसटी बसची सोय आशा अत्यंत बिकट समस्याच्या विळख्यात ऊसतोड मजूर कुटुंब अडकले होते. अशातच मानेवाडी गावातील ऊस बागायतदार शेतकरी अजय कानगुडे यांच्या शेतीमध्ये जळगाव येथील ऊसतोड कामगार कामासाठी आले होते . या कुटुंबातील बायडा कैलास पवार ही महिला गरोदर होती . अशा कठीण परिस्थितीत गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागले तिला त्वरित दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. पण दवाखान्यात दाखल करण्याची परिस्थिती नव्हती. मग या गरोदर महिलेला कसे न्यायचे हा मोठा प्रश्न या कुटुंबापुढे पडला त्यातच कोणीतरी या कुटूंबाला कल्पना दिली की, शिंपोरा या गावात राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रच्या आरोग्य सेविका राहतात त्यांचे काम अतिशय चांगले असून त्या नक्की मदत करतील, मग आरोग्य सेविका मेघना पोपट मैड सोनार यांना फोनवरून माहिती दिली, तर आरोग्य सेविका मैड सोनार या लगेचच धावत मानेवाडी येथील या ऊसतोड मजूराच्या झोपडीत दाखल झाल्या. सदर गरोदर महिलेला धीर देत याच झोपडीत या महिलेची सुखरूप प्रसुती केली.

मातेची आणि बाळाची तब्येत चांगली
मानेवाडी गावातील ऊस बागायतदार शेतकरी अजय कानगुडे यांच्या शेतीमध्ये जळगाव येथील ऊसतोड कामगार कामासाठी आले होते . त्यामधील बायडा कैलास पवार ही महिला गरोदर होती . राशीन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत बाभूळगाव दुमाला उपकेंद्रातील आरोग्य सेविका मेघना पोपट मैड सोनार या आरोग्य सेविकेने शनिवारी सायंकाळी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीमध्ये जाऊन गर्भवती महिलेची सुरक्षित प्रसूती केली . सध्या मातेची आणि बाळाची तब्येत चांगली आहे . सदर महिलेने कन्यारत्नास जन्म दिला आहे . आरोग्य सेविका मेघना मैड सोनार यांनी दाखवलेल्या तत्पर सेवेबद्दल गटविकास अधिकारी अमोल जाधव , सभापती अश्विनी कानगुडे, राशीन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . दिलीप व्हरकटे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पुंड , राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका व बाभूळगावचे सरपंच निवृत्ती कानगुडे , उपसरपंच व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .