मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला

तळेगाव दाभाडे:  मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असून अधून मधून मात्र पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. पावसाचे प्रमाण घटल्यामुळे नदी, नाल्यांची पाणी पातळी घटत चालली आहे.  यावर्षी मावळ तालुक्यात जून, जुलै,ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी ऑगस्ट महिन्यात सलग तीन आठवडे जोरदार पावसाने थैमान मांडले आहे. या उलट जून आणि जुलै महिन्यात मात्र पावसाने प्रचंड ताण दिला होता. एकट्या ऑगस्ट महिन्यात सुमारे ३२% पावसाने हजेरी लावली आहे. या तीन महिन्यात वेळोवेळी एकूण ५८ दिवस पाऊस पडलेला असून लोणावळा येथे एकूण ३ हजार १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कॉलेकॉलनी येथे १ हजार २२७ मिलिमीटर, वडगाव ८०६ मिलिमीटर, खडकाळे ८४८ मिलिमीटर, तळेगाव ५९४ मिलिमीटर, तर शिवणे येथे ५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी संततधार पर्जन्यवृष्टी झालेली असून पश्चिम पट्ट्यातील लोणावळा-खंडाळा, पवनानगर परिसर कार्ला, उकसान, वडेश्वर,वाहनगाव, खांडी आदी भागात यावेळी जोरदार पाऊस झाल्याने या भागातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झालेली आहे. वडिवळे, आंद्रा, तसेच इतर छोटी-मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. पवना धरण मात्र ९० टक्‍क्‍यां पर्यंत भरत आलेले आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस समाधानकारक आणि चांगला झाल्याने खरीप भात पीक चांगले आले आहे. तर सोयाबीन,भुईमूग, कडधान्ये या पिकांची स्थिती ही चांगली असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तर अशीच पावसाची उघडीप राहिल्यास पूर्वभागातील शेतकरी रब्बी पिकाच्या पूर्ण मशागतीला लागतील. मावळच्या पूर्व भागात रब्बी ज्वारी,गहू, हरभरा या पिकांची पेरणी काही गावांमध्ये केली जाते.