मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून

कोंढणपूर मार्गावरील गेल्या वर्षी केलेला नवीन रस्ता

भोर : पुणे-सातारा मार्ग ते कोंढणपूर (ता. हवेली) मार्गावरील सागराची ताल येथील रस्त्याचा मोठा भाग सोमवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने वाहून गेला. त्यामुळे नजीकच्या दहा गावांचा संपर्क तुटला होता. तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठल्यामुळे पिकांचेही नुकसान झाले. स्थानिक नागरिक व पोलीसांनी जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलावरून तात्पुरती सोय केल्याने वाहतूक सुरू झाली.

-नवीन पुलाचे काम संथ गतीने सुरू
गेल्याच वर्षी येथे रस्ता खचून वाहून गेला होता.कोंढणपूर फाटा ते सिंहगड रस्त्याचे काम दिड वर्षापासून सुरूच आहे. त्यामुळे कोंढणपूरसाठी हा नवीन पर्यायी रस्ता केला आहे. सोमवारी दुपारी या भागांत जोरदार पाउस झाला. त्यामुळे येथील पुलावर शेतातील पाणी वाहून आले. पाण्याचा प्रवाह खूपच मोठा असल्यामुळे तेथील रस्ताचा मोठा भाग खचून वाहून गेला. त्यामुळे पुढील दहा गावंचा संपर्क तुटला. चार तासाने पाउस थांबल्यावर स्थानिक नागरिक व पोलीसांनी जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलापर्यंत तात्पुरती सोय करून वाहतूक सुरू केली आहे.

गेल्या वर्षीचे काम निकृष्ट झाल्यामुळे जोरदार पवासामुळे पुन्हा रस्ता वाहून गेला. नवीन रस्ता व पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी सोय नाही. त्यामुळे पावसाळ्यात अशा समस्यांना तोंड दयावे लागते अशी तक्रार स्थानिक करीत आहेत