हिंजवडीत १८ हॉटेलमधील हुक्काबार सिल; कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी सूचना देऊन देखील हॉटेल, हुक्काबार सुरु होते. त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने या आस्थापना सील करण्यासाठी पोलीसांनी मुळशी तहसिलदार यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर केला होता. तहसिलदारांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

  पिंपरी: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंध व अटींचे उल्लंघन करून हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्काबार सुरु ठेवणाऱ्यांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत परिसरातील १८ हॉटेल सिल करण्यात आल्या आहेत.

  पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्य व जिवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुर ठेवण्यात आल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकांना ऑनलाईन घरपोच सेवा देण्याची परवानगी आहे. मात्र, अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज आणि हुक्काबार चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. हिंजवडी पोलिसांनी अशा आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नेमली होती. या पथकांनी हिंजवडी-माण, देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्ग आणि बावधन परिसरातील हॉटेल, बिअर शॉपी, रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई केली.

  हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी वेळोवेळी सूचना देऊन देखील हॉटेल, हुक्काबार सुरु होते. त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने या आस्थापना सील करण्यासाठी पोलीसांनी मुळशी तहसिलदार यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर केला होता. तहसिलदारांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्य सरकारचा लॉकडाऊन संपण्याचा आदेश होईपर्यंत या आस्थापना सीलबंद करण्यात आल्या आहेत. ही कारवाई हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, अजय जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, फौजदार साळूंके, खडके, मुदळ, काकडे, यलमार यांच्या पथकाने केली.

  कारवाई करण्यात आलेले हॉटेल

  १) मोफोसा हॉटेल – ऑक्सफर्ड रोड, बावधन, २) हॉटेल रुडलाऊंज – हिंजवडी,३) हॉटेल ठेका रेस्टो लॉज – हिंजवडी,४) हॉटेल अशोका बार अँड रेस्टो – हिंजवडी,५) हॉटेल बॉटमअप – हिंजवडी, ६) श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट – माण,७) महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज – मारुंजी, ८) हॉटेल शिवराज – पुनावळे, ९) कविता चायनिज सेंटर – मारुंजी, १०) हॉटेल पुणेरी – बावधन, ११) हॉटेल आस्वाद – हिंजवडी, १२) हॉटेल ग्रीनपार्क – बावधन, १३) फॉच्र्युन डायनिंग एल.एल.पी. / ठिकाणा हॉटेल – हिंजवडी, १४) हॉटेल टिमो – बावधन, १५) वॉटर-९ मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच – बावधन खुर्द, १६) एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट – कासारसाई, १७) योगी हॉटेल – ताथवडे, १८) यश करण बिअर शॉपी – हिंजवडी
  ————————