सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर हॉटेल ग्रँड मन्नत सहा महिन्यांसाठी सील

हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलमध्ये आरोपी सहा तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिथे बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवलेत्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या तरुणींची सुटका केली. या तरुणींना रेस्क्यु फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे

पिंपरी: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर हॉटेल ग्रँड मन्नतला सहा महिन्यांसाठी सील करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात हिंजवडी येथील हॉटेल मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सहा महिलांची सुटका करत चार इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या या हॉटेलला सहा महिन्यांसाठी पोलिसांनी टाळे लावले आहे.

गणेश कैलास पवार (वय २०, रा. हॉटेल ग्रॅन्ड मन्नत, येळवंडे वस्ती, हिंजवडी, पुणे. मूळ रा. सताळ पिंपरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद), समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसुफ सरदार शेख, हिरा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

हिंजवडी फेज एक येथील येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलमध्ये आरोपी सहा तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिथे बनावट ग्राहक बनवून एकाला हॉटेलवर पाठवले आणि माहितीची खात्री केली.

त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या तरुणींची सुटका केली. या तरुणींना रेस्क्यु फाऊंडेशन, संरक्षण गृह, मोहम्मदवाडी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. हॉटेलचा मॅनेजर आरोपी गणेश पवार आणि त्याच्या अन्य साथीदार पीडित तरुणींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सेर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतःचे व्हॉटस अ‍ॅप नंबर प्रसारित केले होते. त्या क्रमांकावर संपर्क केल्यावर ते पीडित तरुणींचे फोटो पाठवायचे व त्याठिकाणी सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत असत. अशा प्रकारे हे सेक्स रॅकेट ऑनलाईन माध्यमातून चालू होते. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

त्यानंतर हॉटेल ग्रँड मन्नत हे हॉटेल सीलबंद करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. आयुक्तांनी कायदेशीर बाबींचे अवलोकन केले. त्यानंतर हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तांकडे पाठवला. त्यांच्या आदेशानुसार हॉटेल ग्रँड मन्नत हे हॉटेल सहा महिन्यांसाठी सीलबंद केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक निरीक्षक देडगे, उपनिरीक्षक अनंत दळवी, पोलीस हवालदार किरण पवार, विजय घाडगे, अविनाथ कुंटकर यांनी केली आहे.