
पुणे : बिर्याणी खाण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेला तरुण बिर्याणीच्या ऐवजी लाथा-बुक्क्यांचा मार खाऊन आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. फक्त दहा रुपयांमुळे सगळा घोळ झाला आहे.
अंकुश काळे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या मारहाणी प्रकरणी त्याने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंकुश याला बिर्याणी खाण्याची इच्छा झाली म्हणून तो बेनकर वस्ती येथील एका हॉटेलमध्ये बिर्याणी पार्सल आणण्यासाठी गेला.
मात्र, बिर्याणीसाठी त्याच्याकडे दहा रूपये कमी पडले. त्यानंतरही अंकुशने बिर्याणी मागितली. त्याचा राग आल्यामुळे हॉटेलच्या मालकाने अंकुशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढचं नाही तर हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनीही त्याला पाईपने बेदम मारहाण केली.
या प्रकरणी हॉटेल मालक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.