१० लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार ;  शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा सवाल

महापौरांनी पुढील महिन्यात १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना भाजप आणि महापौरांनी जाहीर केलेले उद्दिष्ट आपण कसे साध्य करणार? लसीकरण केंद्र आज दुपारी बंद करावी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुर्तास कठोर निर्बंधाबरोबर लसीकरण करणे हा महत्वाचा पर्याय आहे.

    पिंपरी :  कोरोना प्रतिबंधक लसीचा साठ संपल्याने महापालिकेची अनेक केंद्रे बंद आहेत. सद्यस्थितीत केवळ १९ लसीकरण केंद्र चालू आहेत. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु, आताच लसीचा साठा कमी आहे. महापौरांनी पुढील महिन्यात १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केलेले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना सत्ताधारी भाजप आणि महापौरांनी जाहीर केलेले उद्दिष्ट कसे साध्य करणार ? असा सवाल शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला आहे.

    महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात राहुल कलाटे यांनी म्हटले आहे, शहरात एकूण १०० पेक्षा जास्त (महापालिका ६० आणि खासगी – २९ ) लसीकरण केंद्रामधून नागरिकांना लस देण्याचे काम सुरु आहे. परंतु, आज केवळ १९ केंद्र चालू असून इतर केंद्र लसीअभावी बंद आहेत. लसीची उपलब्धता नसल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केलेले आहे. १ तारखेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस देणार आहोत. असे असताना आज आपल्याकडे लसीचा साठा कमी आहे. तर आपण पुढे नियोजन कसे करणार आहोत.

    महापौरांनी पुढील महिन्यात १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. वास्तविक केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा कमी असताना भाजप आणि महापौरांनी जाहीर केलेले उद्दिष्ट आपण कसे साध्य करणार? लसीकरण केंद्र आज दुपारी बंद करावी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुर्तास कठोर निर्बंधाबरोबर लसीकरण करणे हा महत्वाचा पर्याय आहे. सर्व लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल अशा प्रकारचे नियोजन करून लसीकरणाचा कृती आराखडा जाहीर करावा. जेणेकरून नागरिकांमध्ये लसीकरण बरोबरच लसीकरण केंद्राची जनजागृती होईल असे राहुल कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.