पिंपळोली गावात ”निसर्ग” चक्रीवादळाचा हाहाकार

-६० पेक्षा जास्त घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. वडगाव मावळ : मावळ तालुक्यात निसर्ग चक्री वादळामुळे पिंपळोली, ताजे, पवनानगर भागातील अनेक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-६० पेक्षा जास्त घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात निसर्ग चक्री वादळामुळे पिंपळोली, ताजे, पवनानगर भागातील अनेक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळोली येथील ट्रान्सफॉर्मर खांबासहीत उन्मळून पडला असून या भागातील ६० पेक्षा जास्त घरांचे, पाथरगाव येथील ५ आणि ताजे गावातील ७ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी पिंपळोली ग्रामस्थांनी केली आहे.

काल दिवसभर निसर्ग या चक्री वादळामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. संध्याकाळी सहा नंतर तर याचा वेग खूप जास्त होता. यामुळे सांगीसे, पिंपळोली, ताजे, पवनानगर आणि टाकवे भागातील तसेच मावळ तालुक्यातील बहुतांशी गावांमधील घरांचे आणि शेती पिकाचे सुध्दा नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडून जाणे, विद्युत खांब निखळून पडले तर काही ठिकाणी मोठे वृक्ष सुध्दा उन्मळून पडले आहेत. पिंपळोली येथे सुमारे ६० पेक्षा जास्त घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर ५ घरांच्या भिंती सुध्दा पडल्या आहेत. या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चींधू तावरे, बळीराम पिंपळे, सुभाष पिंपळे, सुनील गुजर, दत्ता गुजर, भागू गायकवाड, राम पिंपळे, बाळू सुतार, बाबाजी गायकवाड, दशरथ लोखंडे, भारत गायकवाड, तुकाराम घोगरे, प्रदीप चौरे यांच्या सहीत अनेकांच्या घराचे आणि सुभाष पिंपळे यांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागतील १२ विद्युत खांब पडले असून ट्रान्सफॉर्मर खांबासहीत उन्मळून पडला आहे.  तत्काळ पंचनामे करावेत आणि ट्रान्सफॉर्मर जोडण्यात यावा अशी मागणी प्रा. मानकू बोंबले आणि ग्रामस्थांनी केली आहे. 

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के आणि तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश  महसूल कर्मचाऱ्यांना दिले आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनाने तत्काळ झाडे काढून रस्ते खुले केले आहेत. घरांचे आणि शेताचे पंचनामे चालू झाले असल्याचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी  सांगितले.