पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळलेल्या पतीची आत्महत्या

रविवारी दुपारनंतर निखिल धोत्रे हा एकटाच आपल्या बेडरुममध्ये होता. सायंकाळी त्याच्या भावाने दरवाजा वाजविला तर त्याने उघडला नाही़ म्हणून त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर निखिलने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

    पुणे : पुण्यात सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आणि पत्नीने हारपिक पाजले असा आरोप केल्याच्या नैराश्यातून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांना सासरच्यावर कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली आहे.

    निखिल शाम धोत्रे (वय २९) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात नोंद केली आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, निखिल धोत्रे हे गोखलेनगर भागात सुगम मंडळ येथे कुटुंबासह राहत होते. दरम्यान त्यांचा एक वर्षापूर्वी सोनाली हिच्याबरोबर विवाह झाला होता. सोनाली या सध्या ९ महिन्यांची गर्भवती आहे. दरम्यान पत्नी सोनाली ही तिच्या बहिणीसोबत फोनवर बोलत होती. त्यावरून वाद घातला आणि सोनाली यांना निखिल, दिर विकास व लक्ष्मी धोत्रे यांनी मारहाण केली. त्यानंतर विकास यांनी पकडून लक्ष्मी यांनी हारपिक पाजले, असा आरोप केल्यावरून चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तिघावर गुन्हा छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. दोन दिवसांपूर्वीच हा गुन्हा दाखल झाला होता.

    त्यानंतर या नैराश्यात निखिल होते. रविवारी दुपारनंतर निखिल धोत्रे हा एकटाच आपल्या बेडरुममध्ये होता. सायंकाळी त्याच्या भावाने दरवाजा वाजविला तर त्याने उघडला नाही़ म्हणून त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर निखिलने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

    आत्महत्या करण्यापूर्वी निखिल याने सुसाईड नोट लिहून ठेवलेली आढळून आले़. त्यात त्याने ‘‘आपल्याला सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे आपण कर्जबाजारी झालो आहे. माझ्या मृत्युला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे म्हणून त्यात सासरकडच्या सर्वांची नावे लिहिली आहेत. त्याच चिठ्ठीत त्याने ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे’, असे लिहिले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस तपास करत आहेत.