धक्कादायक ! भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार

विवाहितेला श्रद्धा असलेल्या एका भोंदूबाबाकडे नेल्यानंतर त्या बाबाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पत्नीला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला.

    पुणे : विवाहितेला श्रद्धा असलेल्या एका भोंदूबाबाकडे नेल्यानंतर त्या बाबाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत पत्नीला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला व पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर विवाहिता वेडसर असल्याचे सांगत तिची बदनामीही केली.

    याप्रकरणी येरवडा येथील आसिफ बाबा याच्यासह पती व त्याच्या इतर नातेवाईक अशा 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात 24 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. कौटुंबिक छळ, अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, जादूटोणा विरोधी कायदा या कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचे व आरोपी पती एकाच ठिकाणी काम करण्यास होते. त्याठिकाणी या दोघांची ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाच्या परवानगीने रितिरिवाजने विवाह देखील केला. त्यानंतर मात्र आरोपीने एकदिवस मेकअप नीट न केल्याच्या कारणावरून वाद घालत मारहाण केली. तेथून पीडित महिलेच्या छळाला सुरुवात झाली. तिचा पगार देखील जबरदस्तीने घेतला जात होता.

    यादरम्यान सासू-सासऱ्यांनी तिला येरवडा येथील 70 वर्षीय आसिफ बाबाकडे नेले. त्या बाबाने विवाहितेला उपचार करण्यासाठी म्हणून खोलीत नेले. त्यावेळी त्याने विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तर बाहेर येऊन सासू-सासरे व त्यांना हिला पतीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवावे लागतील. तिच्या अंगात भूत आहे, ते काढावे लागेल, असेही सांगितले. पतीच्या कुटुंबाचा या बाबावर खूप विश्वास असल्याने त्यांनी बाबाचे ऐकले. पतीने पत्नीच्या मनाविरुद्ध अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले.

    तसेच पगार व इतर कारणांनी छळ सुरू केला. तरीही त्या संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, छळ जास्त होऊ लागला. याशिवाय चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणही केली जात होती. पत्नी वेडसर असल्याची माहिती पसरवून तिची बदनामी केली. तर त्यांना घरातून हाकलून दिले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक तपास करत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.