राज ठाकरे म्हणाले, ‘मी पण घाबरलो होतो’

इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती.

    पुणे : १९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळी सुद्धा हजर होते. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, तू बोलणार आहेस ना. मी म्हटलं, तू काहीतरी बोलू नकोस हा…नाही तर मी येथून निघून जाईन. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे. हे सर्व आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू…अशाप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावर केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.

    राज ठाकरे हे शनिवारी (दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या वतीने आयोजित ”शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

    राज ठाकरे म्हणाले, इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता.
    आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकले सुद्धा आहेत. मात्र, हे लहानपणापासून जरी अनेक दिग्ग्ज वक्त्यांना मी पाहत आलो असलो तरी आयुष्यात कधी बोलेल, असं कधीच वाटलं नव्हतं असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.