सरपंचपदी निवड मी सार्थ ठरवणारच : सरपंच कुसुम भांबुरे

  राजगुरूनगर : श्री तुकाईमातेच्या मंदिर परिसराने पावन झालेले आमचे गाव म्हणजे तुकाईवाडी ! खेड तालुक्यात पुणे- नाशिक महामार्गावर वसलेल्या या गावाला संपन्नतेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या गावाने प्रथम महिला सरपंच म्हणून माझी केलेली निवड मी सार्थ ठरवणारच, असा दृढविश्वास कुसुम संदीप भांबुरे यांनी व्यक्त केला.

  फेब्रुवारी महिन्यात गावकारभारीण म्हणून हातात सूत्रे घेतल्यानंतर गावातील मुख्य कामे पार पाडण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामांचे वार्ड प्रभागानुसार नियोजन केले. सर्व प्रलंबित कामांची अंदाजपत्रक बनविली. नवनवीन कामांना मंजुरी मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. ग्रामविकासासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे व पंचायत समिती सदस्या सुनिता सांडभोर यांचे गावास कायम सहकार्य लाभले आहे.

  कोरोना काळातील कामगिरी

  गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेतले. यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस गुलाबाचे झाड देऊन वृक्षलागवडीला प्रोत्साहन दिले.  कोरोना महामारीत देखील विशेष काळजी घेत लोकसहभागातून जनजागृती करत आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, हँड वॉश, हँड सॅनिटायझर, साबण, मास्क यांचे घरोघरी वाटप केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने गावात लसीकरण शिबीर घेतले. राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोर पालन करीत गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. ग्रामस्थांचे या कठीण काळात खूप सहकार्य मिळाले व भविष्यातही अशी कितीही संकटे आली तरीही आम्ही एकजुटीने गावच्या वेशीवरच राहतील गावामध्ये शिरकाव करू देणार नाही यासाठी प्रयत्न करीत राहू,अशी माहिती सरपंच भांबुरे यांनी सांगितले.

  आगामी संकल्प

  गावासाठी विद्युत स्मशानभूमी उभारणे. तुकाईवाडी ते भांबूरवाडी दरम्यान पूल बांधणी करणे. गाढवेवस्ती ते झनझनस्थळ रस्ता तयार करणे. शेती उपयुक्त रस्ते तयार करणे. गावात वृक्षलागवड करुन गाव हरितक्रांती करणे इत्यादी कामे मार्गी लावण्याचे काम करणार आहे.

  – कुसुम भांबुरे, सरपंच

  (शब्दांकन : अमितकुमार टाकळकर)