gopichand padalkar file pettiton

२१ तारखेला परीक्षा झाली नाही तर वर्षासमोर उपोषण करणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

    पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी रद्द केलेली, परीक्षा येत्या २१ तारखेला घेणार असल्याची घोषणा केली. मात्र २१ तारखेला परीक्षा झाली नाही तर वर्षासमोर उपोषण करणार, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. परीक्षा पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

    मुख्यमंत्र्यांवर कोण दबाव टाकतंय? काल तारीख का जाहीर केली नाही? सरकारमधील इतर मंत्री दबाव टाकत आहेत का?, असे काही सवाल उपस्थित करत हे सरकार अतिशय बेजबाबदार असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तारीख जाहीर केली नाही, म्हणून आंदोलन सुरू ठेवले. पण पोलिसांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपले, असा आरोप पडळकर यांनी यावेळी बोलताना केला.

    दरम्यान, एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली.