….वारकरी परंपरेला गालबोट लावाल तर याद राखाल ,आळंदीकर ग्रामस्थ एकवटले

यंदाची आषाढी वारी परंपरेनुसारच व्हावी अशी मागणी ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर तसेच काही ठराविक वारकरी संघटना व भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून केली जात आहे.

    आळंदी: कोरोनाच्या सावटामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी सोहळा बसने पंढरपूरला घेऊन जाण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. परंतु शासनाचा आदेश डावलत काही वारकरी संघटनांनी परंपरेनुसार पायी वारी सोहळा करण्याचा अट्टाहास धरला आहे. मात्र अशाप्रकारे वर्तन करून संत परंपरेला गालबोट लावणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी घेतली आहे.

    यंदाची आषाढी वारी परंपरेनुसारच व्हावी अशी मागणी ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर तसेच काही ठराविक वारकरी संघटना व भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून केली जात आहे. त्यातच ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी नुकताच आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून म्हटले आहे की, मी उद्या दुपारी २ वाजता माझ्या हजारो व्यसनमुक्तीचे मावळे व काही वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आळंदीत प्रवेश करणार आहे.

    त्यांच्या या आवाहनाला विरोध करत आळंदीकर ग्रामस्थांनी एकवटले आहेत.इतकेच नव्हे तर आळंदीकर ग्रामस्थ म्हणून प्रस्थान सोहळ्याला देवस्थानचे निमंत्रित केलेल्या वारकऱ्यांचे आम्ही स्वागत करू; मात्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आळंदीकर खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.