पाटस येथील भूमिगत गटाराचे काम नियमबाह्य ; ठेकेदारावर कारवाईची मागणी

दौंड :दौंड तालुक्यातील पाटस या गावातील शिवनगर कॉम्प्लेक्स ते पंचरत्न ऑफिस या अंतराच्या बंदिस्त गटार योजनेचे काम नियमबाह्य होत असल्याने काम त्वरित बंद करून कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी वसंत

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस या गावातील शिवनगर कॉम्प्लेक्स ते पंचरत्न ऑफिस या अंतराच्या बंदिस्त गटार योजनेचे काम नियमबाह्य होत असल्याने काम त्वरित बंद करून कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी वसंत साळुंखे यांनी मंगळवार (ता.०९) रोजी लेखी तक्रारीव्दारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

    पाटस गावातील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक असणाऱ्या शिवनगर येथील पानसरे ऑटोमोबाईल शेजारी २०४ मीटरच्या बंदिस्त गटार योजनेसाठी १४ वित्त आयोगातुन २ लाख ९५ हजार ६२९ रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे, या अंतर्गत गटार योजनेचे काम हे अंदाज पत्रक आणि नकाशे प्रमाणे संबंधित ठेकेदार काम करीत नसल्याचे दिसून येत आहे, भूमिगत गटर काम करत असताना संबंधित ठेकेदार यांनी पाईपसाठी योग्य खोदाई केली नसल्याने सिमेंट पाईप जमिनीच्या पातळी पेक्षा वर आले आहेत, तसेच सिमेंट पाईप सरळ रेषेत न टाकता वेडे वाकडे टाकण्यात आले आहेत, तसेच चेंबर बांधकाम अंत्यत छोटे असून पाईप व बांधकामामध्ये ताळमेळ दिसत नाही, तसेच या कामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट पाईप, वाळू इत्यादी साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप वसंत साळुंखे यांनी केला आहे, यावेळी पाटसची माजी सरपंच योगेंद्र शितोळे, दादा भंडलकर व आदी स्थानिक ग्रामस्थांनी भूमिगत गटर पाईपच्या बांधकाम स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली, दरम्यान उपस्थितीतांनी कामाच्या दर्जा संदर्भात हरकत घेतली असून ठेकेदाराला अंदाज पत्रका प्रमाणे योग्य काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत, तसेच ग्रामपंचायत सदस्य संभाजी (बाळू) चव्हाण भूमिगत गटर पाईपच्या नियमबाह्य कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत, पाणी पुरवठा अधिकारी यांनी कामाचे मूल्यांकन व ठेकेदाराला रक्कम देण्याची सूचना न देता ग्रामपंचायतने संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपये कोणत्या नियमात दिले असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत, 

   संबंधित कामाचे पाईपचा काही भाग जमिनीच्या पातळीच्या वर असल्याने काम पूर्ण होण्याअगोदरच अनेक ठिकाणी सिमेंट पाईप फुटलेला आहे, पुढील काळात अंतर्गत गटार वरून अवजड वाहने गेल्यास पाईप फुटून सांडपाणी परिसरात साचून दुर्गंधी पसरून रोगराई निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत, भविष्यात परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे सदरचे काम त्वरीत थांबवण्यात यावे व संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंदाजपत्रक प्रमाणे काम करण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत अशी मागणी वसंत साळुंखे यांनी दौंड तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे,

ग्रा.पं .सदस्याची ग्रामस्थांना काम रद्द करण्याची धमकी 

भूमिगत गटर पाईपचे नियमबाह्य कामाची तक्रार ग्रामस्थांनी केल्याने ग्रामपंचायत सदस्य बाळू चव्हाण यांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन भूमिगत गटर पाईपचे काम व मंजूर रस्त्याचे काम रद्द करण्याची धमकी शासकीय अधिकारी यांच्या  समोर ग्रामस्थांना दिली आहे, 

” भूमिगत गटर पाईपच्या कामासाठी संबंधित ठेकेदाराला एकूण रक्कमे पैकी एक लाख रुपये अदा करण्यात आले आहेत, ठेकेदाराला अंदाजपत्रका नुसार काम करण्याच्या लेखी सूचना देण्यात आली आहे.”

-सुभाष डोळस (ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पाटस)