कोलवडी-साष्टे येथील अवैध हातभट्टी उध्वस्त

-९३ जणांवर कारवाई;लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

वाघोली : (ता. हवेली) कोलवडी-साष्टे, केसनंद परिसरातील अवैध दारू भट्ट्यांवर लोणीकंद गुन्हे शोध पथकाने छापे टाकून दारू भट्ट्या उध्वस्त केल्या असून विक्रेत्यांवर कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढत्या अवैध धंद्यांचा समूळ नष्ट करण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी वेगवेगळे पथक बनवले आहे. या पथकाद्वारे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे चालू असलेल्या हातभट्ट्या, दारू विक्रेत्यांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे हातभट्टी चालक व गावठी दारू विक्रेत्यांसह अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

-दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई होणार

लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथक सोमवार (३ ऑगस्ट) रोजी गस्तीवर असताना मौजे कोलवडी-साष्टे गावचे हद्दीत नदीचे कठालागत रिकामे वस्ती येथे दोन इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य व साधने वापरून दारू काढत असल्याची खात्रीशीर बातमी गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने रिकामे वस्ती या ठिकाणी जाऊन छापा घातला असता राजू दादासाहेब केकान (वय २९), अविनाश विलास ससाणे (वय २७, रा. साष्टे गायरान) हे दोघेही गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधनांसह मिळून आले. २ हजार लीटर कच्चे रसायन, १४० लिटर दारू व अन्य साहित्य असा एकूण ५७,७०० रुपये किंमतीचा माल मिळून आला. त्याबरोबर केसनंद गावचे हद्दीत लोणीकंद-केसनंद रोडवरील शिवशाही हॉटेलजवळ असणाऱ्या कटवणात अवैध दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करून विष्णू मारुती कांबळे (वय २९, रा. केसनंद) यास ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-५५ जणांवर कारवाई

लोणीकंद पोलिसांनी १ जुलै ते ३१ जुलै २०२० या कालावधीत दारूबंदीचे ३७ गुन्ह्यांमध्ये ३८ जणांवर कारवाई केली आहे. तर जुगाराचे ५५ गुन्हे दाखल केले असून ५५ जणांवर कारवाई केली आहे. दारूबंदी कारवाईमध्ये एकूण २ लाख ४९ हजार २५२ रुपयांचा तर जुगार कारवाईमध्ये १ लाख ८२ हजार ७९७ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.  

हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई-भोरे पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, देवेंद्र बेंद्रे, ऋषिकेश व्यवहारे या पथकाने कारवाई केली आहे.