“गुडफिल किट” खरेदीचा विषय त्वरित रद्द करा; माजी आमदार विलास लांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीकडे मागणी

‘गुडफिल’ किट वाटपाच्या नावाखाली होणा-या सुमारे १० कोटींच्या भ्रष्टाचाराला आपण आळा घालावा. त्यासाठी हा विषय त्वरीत रद्द करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना द्यावेत

    पिंपरी: महापालिकेच्या शाळा बंद असताना विद्यार्थिनींसाठी ‘गुडफिल’ किट खरेदीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी सुमारे १० कोटींची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. सध्या विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून आर्थिक मलिदा लाटण्यासाठी या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

    यासंदर्भात लांडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदने दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात कडक निर्बंध लागू आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गेल्या दीड वर्षांपासून शाळा देखील बंद ठेवल्या आहेत. विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन शिक्षण शिकत आहेत. विद्यार्थी घरामध्ये सुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आपल्या नियंत्रणाखाली राज्याच्या आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा समोर करून ‘गुडफिल’ किट खरेदी करण्याचा विषय मंजूर केला आहे. त्यावर पालिकेचे सुमारे १० कोटी रुपये खर्च होणार आहेत. शाळा सुरू नसताना शिक्षण समितीने आर्थिक मलिदा लाटण्यासाठी हा विषय समोर आणला आहे. त्याला स्थायी समितीने ४ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे.

    शहरामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १२३ शाळा आहेत. दोन्ही विभागाच्या शाळांमध्ये शिकणा-या २५ हजार विद्यार्थिनींना ‘गुडफिल’ किट वाटप करण्यात येणार आहे. किटमध्ये १ अंडरगारमेंट आणि २ डबललेअर मास्कचा समावेश आहे. प्रति किट १७९९ रुपयांचा दर लावण्यात आला आहे. प्रति विद्यार्थिनी दोन किट उपलब्ध करून देण्याचा करार मे. एस. आर. इन्नोव्हेटिव्ह प्रा. लि. या ठेकेदार संस्थसोबत केला जाणार आहे. प्रति किट १७९९ रुपये दरानुसार सुमारे २५ हजार विद्यार्थिनींसाठी ५० हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. प्रति किट १७९९ या दरानुसार ५० हजार किट खरेदी करण्यासाठी ८ कोटी ९९ लाख ५० हजार एवढा खर्च केला जाणार आहे. विद्यार्थिनींना कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे किट वाटप करण्याचा सदस्यपारित प्रस्ताव शिक्षण समितीने केला आहे. शाळा बंद असताना अशा प्रकारे नागरिकांच्या पैशांची लूट करण्याचा कार्यक्रम सत्ताधा-यांनी हाती घेतला आहे.

    आयुक्तांना सक्त आदेश द्यावेत

    सध्या देश कोरोना परिस्थितीचा सामना करत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी घरामध्ये सुरक्षित असताना ‘गुडफिल’ असे गोंडस नाव देऊन अत्यल्प शूल्काच्या वस्तू चढ्या दराने खरेदी करून सत्ताधारी नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. तरी, ‘गुडफिल’ किट वाटपाच्या नावाखाली होणा-या सुमारे १० कोटींच्या भ्रष्टाचाराला आपण आळा घालावा. त्यासाठी हा विषय त्वरीत रद्द करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना द्यावेत, अशी मागणी माजी आमदार लांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.