अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ‘ही’ सिस्टम कार्यान्वित करा!

द्रूतगती मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या असलेली यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करणे क्रमप्राप्त आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

  पिंपरी: वाढते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी मुंबई- पुणे द्रूतगती महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ तात्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहरांना जोडणाऱ्या सुमारे ९४.५ किमी द्रूतगती महामार्गावरुन दिवसाला सरासरी ६० हजार वाहने प्रवास करतात. या मार्गावरील वाहतुकीसाठी अनेक नियम घालून दिलेले आहेत. पण, त्याचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  दरम्यान, द्रूतगती महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी तसेच वाहनचालक- प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून संबंधित निविदा प्रक्रिया रखडली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना आणि आर्थिक अडचणींचे कारण पुढे करण्यात येत आहे. परंतु, एमएसआरडीसीने यावर तात्काळ तोडगा काढून कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
  द्रूतगती मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सध्या असलेली यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करणे क्रमप्राप्त आहे. बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आर्थिक अडचणींचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, सार्वजनिक- खासगी तत्वावर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करता येईल का? याचाही विचार प्रशासनाने प्राधान्याने केला पाहिजे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

  अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल : मोढवे-पाटील ‘आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वेगाचे नियम मोडणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना शोधून काढत त्यांना जवळच्या टोलनाक्यावर रोखले जाणार असून, त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. अपघात झाल्यास त्या ठिकाणी तात्काळ आवश्यक ती मदत पुरवणे सोपे होणार आहे. तसेच, अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम, लेन डिसिप्लेन व्हालेशन डिटेक्शन सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे. वास्तविक, २०१९ मध्ये या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, कोरोना, लॉकडाउन आणि आर्थिक अडचणींचे कारण पुढे करीत प्रशासनाने चालढकल केली आहे. वाहनचालक, प्रवाशी यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने उपयायोजना करुन ठोस कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. यावर एमएसआरडीसी प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा.

  दीपक मोढवे-पाटील